पुणे : दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुण्याहून दिल्लीत जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेची सोय केली आहे. अंतिम मान्यतेसाठी तातडीने एकूण रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. ती भरण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी सोमवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनासाठी दिल्लीला जाणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी एका विशेष रेल्वेची संस्थेने मागणी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री व संमेलनाचे सरकार्यवाहक मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे मंजूर झाली आहे. महाकुंभ आणि इतर अडचणी असतानाही या संमेलनासाठी मंत्रालयाने ही रेल्वे मंजुरी केली आहे. १७ डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे स्लीपर असणार आहे. ती १९ फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघेल आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल. परतीचा प्रवास २३ फेब्रुवारी रोजी रात्री सुरू होईल आणि पुण्यात २४ फेब्रुवारी रोजी येईल.
ही विशेष रेल्वे असल्याने यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटाच्या तीन पट आहे. यामध्ये सवलत देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुरलीधर मोहोळ प्रयत्न करीत आहेत. मात्र रेल्वे मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची सवलत कोणालाही न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ही सवलत न मिळाल्यास दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी १५०० रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला. जादा येणारी ही रक्कम देणगीदारांकडून जमा होईल.
नोंदणी कुठे करायची?
रेल्वेसाठी नोंदणी सरहद पुणे कार्यालय, सर्व्हे नं. ६ धनकवडी, पुणे-४३ किंवा साहित्य परिषद, पुणे कार्यालयात करता येईल, असे आवाहन संयोजन संजय नहार यांनी केले.
राज्यभरातून ६०० जणांची नोंदणी
आतापर्यंत संयोजकांकडे राज्यभरातून ६०० जणांनी नोंदणी केली. सहभागी प्रतिनिधींकडून रक्कम घेतली जात असली तरीदेखील दिल्लीला जाण्याचा, राहण्याचा व सर्व मिळून एकाचा खर्च १६ हजार रुपये होणार आहे.
दोन थांबे
विशेष रेल्वेसाठी पुण्याहून दिल्लीला जाताना जळगाव आणि ग्वाल्हेर असे दोन थांबे घेतले आहेत, तर परत येतानादेखील दोन थांबे असतील. रेल्वे ज्या ठिकाणी थांबेल तिथे विशेष काही करता येईल काय? त्याचे नियोजन करत असल्याचे संजय नहार म्हणाले.