संवेदनशील बूथवर विशेष बंदोबस्त
By Admin | Updated: October 11, 2014 06:43 IST2014-10-11T06:43:13+5:302014-10-11T06:43:13+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे

संवेदनशील बूथवर विशेष बंदोबस्त
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. स्वत: पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्यासह शहर पोलीस दल आणि निमलष्करी दलाच्या दहा कंपन्या- असा आठ हजार पोलिसांचा खडा पहारा मतदानाच्या दिवशी राहणार आहे.
विशेष शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९९६ इमारतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नऊपेक्षा अधिक बूथ असलेल्या ११५ इमारतींमध्ये एक अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही शहरांतील ‘क्रिटिकल’ असलेल्या ७३ व पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ८५ केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे.
ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, अशा सहा इमारतींचा एक सेक्टर (विभाग) असे एकूण १२० विभाग तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागामध्ये एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी गस्त घालणार आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पाच ते सात मिनिटांचा ‘रिस्पॉन्स टायमिंग’ ठेवण्यात आलेला आहे. पाच ते सात मिनिटांतच त्याठिकाणी संबंधित विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह त्यांच्या स्ट्रायकिंग फोर्सची आठ ते दहा वाहने पोहोचतील, असे नियोजन करण्यात आल्याचे घाडगे यांनी सांगितले.