मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब

By Admin | Updated: February 23, 2017 03:24 IST2017-02-23T03:24:56+5:302017-02-23T03:24:56+5:30

चित्रपटांमुळे मुले बिघडतात. नको त्या वयात मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतात, असे म्हणत मुलांना

Special movie clubs for children | मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब

मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब

पुणे : चित्रपटांमुळे मुले बिघडतात. नको त्या वयात मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतात, असे म्हणत मुलांना चित्रपट आस्वादापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याबरोबरच मुलांमध्ये चित्रसाक्षरता ही संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि आरभाट फिल्म्स या दोन संस्थांनी मुलांसाठी विशेष चित्रपट क्लब सुरू करण्याच्या दिशेने अभिनव पाऊल टाकले आहे.
दर महिन्याच्या शनिवारी किंवा रविवारी चित्रपट स्क्रिनिंगद्वारे चित्रपटसृष्टीच्या वारशाचा मुलांना परिचय करून देणे, हे या नव्या चित्रपट क्लबचे उद्दिष्ट आहे. चित्रपटावर मुलांशी चर्चा घडविण्यावर भर दिला जाईल. हा क्लब ९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी खुला राहील. दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ दरम्यान एनएफएआय कोथरूड येथे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते सत्यजित रे यांच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘सोनार केल्ला’ या पहिल्या स्क्रिनिंगने क्लबचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम आणि आरभाटचे उमेश कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘चित्रपटाचे अचूक प्रेक्षक कुणी असतील तर ती मुले. पडद्यावर पाहत असलेल्या चित्रकृतीबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात, जगात जे घडत आहे, त्याबद्दल त्यांच्या संवेदनशील जाणिवा जागृत असतात. मुलांमध्ये चित्रपटविषयक जागरूकता रुजविण्यासाठी हा चित्रपट क्लब निर्मित करण्यात आला असून, एक पोषक चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराला त्याची नक्कीच मदत होईल. या चांगल्या उपक्रमांना मुलांना सोडण्या-आणण्याचा प्रश्न पालकांना नक्कीच भेडसावतो; पण पालकांनीच मुलांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.’’
मगदूम म्हणाले, ‘‘या उपक्रमाला मुलांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी शहरातील सर्व शाळांशी आम्ही संपर्क साधला आहे. यासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात येणार आहे.’’

Web Title: Special movie clubs for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.