चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवारी पालिकेत विशेष सभा

By Admin | Updated: February 9, 2016 04:43 IST2016-02-09T04:43:50+5:302016-02-09T04:43:50+5:30

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी, १२ फेब्रुवारी रोजी विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Special meeting will be held in the city on Friday for water supply for 24 hours | चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवारी पालिकेत विशेष सभा

चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवारी पालिकेत विशेष सभा

पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी, १२ फेब्रुवारी रोजी विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी पाणीपट्टीमध्ये ५ वर्षांमध्ये ८७ टक्के वाढ करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, त्यावर अंतिम निर्णय मुख्य सभेत घेतला जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे. या योजनेमध्ये पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यास मनसे, शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये पाठिंबा दिला आहे. पाणीपट्टीमध्ये २०१६-१७ या वर्षासाठी १२ टक्के त्यानंतर २०२१ पर्यंत पुढील ५ वर्षे प्रत्येकी १५ टक्के त्यानंतर २०४७ पर्यंत प्रतिवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीवर आज चर्चा
महापालिकेच्या इमारतींवर सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यासाठी खासगी ठेकेदाराला ठेका देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराला ३० वर्षांसाठी हे काम दिले जाणार आहे. त्याकरिता देखभाल खर्च म्हणून त्याला महापालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत. महापालिकेला या प्रकल्पातून स्वस्तात वीज मिळणार आहे. मात्र खासगी ठेकेदाराकडून वीजनिर्मिती करण्यापेक्षा महापालिकेने स्वत: वीजनिर्मिती करावी अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: Special meeting will be held in the city on Friday for water supply for 24 hours