नगराध्यक्षपदासाठी १६ जूनला विशेष सभा
By Admin | Updated: June 6, 2016 00:29 IST2016-06-06T00:29:45+5:302016-06-06T00:29:45+5:30
येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (दि. १६) होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नगराध्यक्षपदासाठी १६ जूनला विशेष सभा
तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (दि. १६) होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्तारूढ शहर विकास समितीच्या नगरसेविका शालिनी खळदे यांची नूतन नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याविषयी एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सांगितले. नगराध्यक्षा माया भेगडे यांचा ठरवून दिलेला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ३१ मे रोजी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे राजीनामा दिला होता. तो मंजूर झाल्याने ही निवडणूक होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील थोरवे हे काम पाहणार असून, मुख्याधिकारी कैलास गावडे सहायक म्हणून निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहणार आहेत. जाहीर कार्यक्रमानुसार ८ ते १० जून या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरवात होईल. अर्ज माघारी घेण्याची तारीख १५ जून आहे. १६ जूनला दुपारी १२.३० वाजता निवडणुकीसाठी सभागृहात विशेष सभा होईल.
नगराध्यक्षपद महिलांच्या खुल्या गटासाठी आरक्षित आहे. सत्ताधारी शहर विकास समितीचे १४, तर विरोधी पक्षाचे ९ सदस्य आहेत. यापूर्वीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीचा विचार करता ही निवडणूक बिनविरोध होण्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. येत्या डिसेंबरअखेर
नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामाचा धडाका सुरू आहे. (वार्ताहर)