मिळकत करवाढीसाठी विशेष सभा
By Admin | Updated: December 17, 2014 05:27 IST2014-12-17T05:27:12+5:302014-12-17T05:27:12+5:30
महापालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात पाणीपट्टीसह मिळकतकरामध्ये २२ टक्के वाढीच्या प्रस्तावावर स्थायीची विशेष सभा

मिळकत करवाढीसाठी विशेष सभा
पुणे : महापालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात पाणीपट्टीसह मिळकतकरामध्ये २२ टक्के वाढीच्या प्रस्तावावर स्थायीची विशेष सभा बोलावून त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये हा विषय आल्यानंतर यावर सविस्तर चर्चा करण्याकरिता स्थायी समितीची विशेष सभा बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेला गेल्या वर्षभरापासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) अपेक्षित जमा होत नाही, तसेच बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळेही पालिकेच्या उत्पन्नात घट झालेली आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत मिळतकरांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. वृक्षकर, सफाईपट्टी, जल लाभकर, जल:निस्सारण, पथ, शिक्षण उपकर यात वाढ सुचविण्यात आली आहे. या करवाढीमुळे उत्पन्नात १९१ कोटी ७१ लाखांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. पाणीपट्टीमध्ये जी दरवाढ सुचविण्यात आली आहे, त्यामधून सरासरी पाणीपट्टीमध्ये ९०० रुपये इतकी वार्षिक वाढ येत आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा विषय आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी दिली. (प्रतिनिधी)