सोनोग्राफीतज्ज्ञांचा पालिकेवर मोर्चा
By Admin | Updated: December 8, 2015 00:13 IST2015-12-08T00:13:45+5:302015-12-08T00:13:45+5:30
गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या जाचक व अतार्किक तरतुदींच्या विरोधात इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) वतीने सोमवारी

सोनोग्राफीतज्ज्ञांचा पालिकेवर मोर्चा
पुणे : गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या जाचक व अतार्किक तरतुदींच्या विरोधात इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) वतीने सोमवारी शहरात आयएमए ते महापालिका असा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शहर व जिल्ह्यातील साधारण १०० रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट व अन्य तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.
या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वीरेन कुलकर्णी, सचिव डॉ. हिमानी तपस्वी, सह-सचिव डॉ. प्रशांत चौधरी व डॉ. मंगल महाजन, खजिनदार डॉ. राजलक्ष्मी देवकर, कार्यकारी व सल्लागार सदस्य डॉ. ए. बी. केळकर, डॉ. एम. आर. गुलाटी, डॉ. आदेश बुटाला, डॉ. विनय चौधरी, डॉ. गुरुराज लाच्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) डॉ. जयंत नवरंगे, अध्यक्ष डॉ. अविनाश भूतकर आदी या वेळी उपस्थित होते. आयएमएच्या कार्यालयापासून सुरु झालेला मोर्चा टिळक रोडमार्गे जंगली महाराज चौकातून काँग्रेस भवनमार्गे शिवाजीनगर येथील पुणे महानगरपालिकेच्या इमारतीपर्यंत आला. मुली वाचवा, प्रामाणिक डॉक्टरांना वाचवा, असे संदेश देणारे फलक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सोनोग्राफीतज्ज्ञांनी हातात घेतले होते.
या आंदोलनाविषयी सांगताना डॉ. वीरेन कुलकर्णी म्हणाले, गर्भलिंग निदानाच्या आधारे स्त्रीभ्रूणहत्या करण्याच्या कृतीचा सर्व सोनोग्राफीतज्ज्ञ विरोध करतो. या बंदमुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होणे शक्य असले तरीही हे आंदोलन रुग्णांच्या विरोधात नसून कायद्याच्या विरोधात आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. परंतु गंभीर गुन्हा आणि माहिती संकलनाच्या प्रक्रियेसारख्या कागदोपत्री किरकोळ त्रुटींसाठी एकच शिक्षा असू नये.
काही जणांच्या चुकीची शिक्षा सर्वांना भोगावी लागणे हे चुकीचे आहे. त्यामुळे सरसकट सर्व डॉक्टरांना क्षुल्लक कागदोपत्री त्रुटींसाठी नाहक त्रास होऊ नये यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
आंदोलनामुळे सोमवार व मंगळवार शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील एक्स-रे व सोनोग्राफी बंद राहणार असून असोसिएशनच्या या आंदोलनात बुधवारी राज्यातील सर्व सभासद सहभागी होणार आहेत.
(प्रतिनिधी)कागदोपत्री किरकोळ चुका झाल्यास त्यासाठी कायद्यात दंडात्मक तरतूद करावी, मात्र प्रामाणिक सोनोग्राफीतज्ज्ञ, डॉक्टरांना वेठीस धरू नये. ज्या डॉक्टरांवर अशा किरकोळ कारणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत किंवा कायद्यात बदल होईपर्यंत या न्यायप्रविष्ठ प्रकरणांना स्थगिती द्यावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी महापालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी (दि. ८) भेट घेण्यात येणार आहे
- डॉ. वीरेन कुलकर्णी, आयआरआयए अध्यक्ष