‘सोमेश्वर’ची आर्थिक दिवाळखोरी गाजणार
By Admin | Updated: September 12, 2014 03:26 IST2014-09-12T03:26:27+5:302014-09-12T03:26:27+5:30
बारामती, पुरंदर, खंडाळा या तीन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला

‘सोमेश्वर’ची आर्थिक दिवाळखोरी गाजणार
सोमेश्वरनगर : बारामती, पुरंदर, खंडाळा या तीन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज (दि. १२ सप्टेंबर) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुद्दा चांगलाच गाजणार आहे. ऊस उत्पादकांनी, सर्व विषयांवर संचालक मंडळांनी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.
गैरव्यवहाराशी संबंधित दोषी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठराव करणे आणि योग्य विषय मंजूर तर अयोग्य विषय नामंजूर करणे असे अधिकार उद्या सभासदांना वापरावे लागणार आहेत. तरच १७ हजार सभासदांचा प्रपंच वाचणार आहे.
सोमेश्वर कारखान्यात जो काही गैरव्यहार झाला आहे, तो संचालक मंडळ, अधिकारी बरोबर अनेक बडे मासेही असल्याचे सभासदांच्यात बोलले जात आहे. कारखान्याला अडचणीत आणलेल्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका सभासदांची आहे.
राज्यात अग्रेसर म्हणून ओळख असलेल्या कारखान्याची आर्थिक दिवाळखोरी झाली असल्याचे लक्षात आल्यावर सभासदांच्यात संतप्त भावना निर्माण झाल्या. ज्यांच्यावर विश्वास ठेवून १७ हजार सभासदांचा प्रपंच हातात दिला, त्यांनीच आज कारखान्याची ही दुर्दशा केल्यामुळे सभासद नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत कारखान्यावर झालेला कर्जाचा डोंगर व ५२ कोटी रुपयांच्या अपहाराबद्दल हात झटकले असून, याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीजवळ बोलून दाखविले. एकीकडे कारखान्याचे विरोधक व शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढत संचालक मंडळाला बेड्या ठोकल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर कारखान्याचे ज्येष्ठ सभासद सर्जेराव काकडे यांनी कारखान्यातील ५२ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
कारखाना वाचवायचा असेल तर सर्व सभासदांना पक्ष सोडून एक होण्याशिवाय पर्याय नाही, तरच या कर्जाच्या बोजातून सोमेश्वर वाचू शकतो. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. (वार्ताहर)