प्रदेश काँग्रेसच्या यादीत पुण्यातून आणखी काहीजण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:03+5:302021-09-02T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीत पुण्यातूनही आणखी काही नावांची भर पडणार असल्याची चर्चा आहे. याआधी ...

प्रदेश काँग्रेसच्या यादीत पुण्यातून आणखी काहीजण?
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीत पुण्यातूनही आणखी काही नावांची भर पडणार असल्याची चर्चा आहे. याआधी जाहीर झालेल्या यादीतील नावांवरून शहरात सुरू झालेली चर्चा अजूनही थांबायला तयार नाही. त्यातही पुन्हा ज्यांनी गेली काही वर्षे काँग्रेसबरोबर काही संबंधही ठेवला नाही, अशांची नावे थेट प्रदेश कार्यकारिणीत आल्याने सुरू झालेली टीका कायम आहे.
पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असणाऱ्या काहींनी वरिष्ठांकडे एकतर त्यांना वगळा किंवा मग आम्हाला घ्या, अशी मागणी केल्याचे समजते.
नागपुरातील काही नावांच्या समावेशासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत गेले होते. त्या वेळीच पुण्यातलीही काही नावे त्यांनी दिल्लीत सांगितल्याची माहिती मिळाली. शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक सर्वच आजीमाजी पदाधिकारी त्यासाठी विचारच न झाल्याने नाराज आहेत. त्यांच्यातील काहींना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळणार असल्याचे सांगितले जाते.
मोहन जोशी यांनी सांगितले की नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली त्या वेळी कार्याध्यक्ष व वरिष्ठ उपाध्यक्षांच्या नावांचीही घोषणा झाली होती. ती नावे कायम आहेत. या यादीत जोशी प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आत्ता नव्याने जाहीर झालेली यादी पुरवणी यादी असल्याचे जोशींनी सांगितले. आणखी एक यादी जाहीर होऊन त्यात पुण्यातील नावे असतील का, यावर असे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असल्याचे जोशी म्हणाले.