कचरामुक्त अभियानातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST2021-06-16T04:14:04+5:302021-06-16T04:14:04+5:30
पुणे : जिल्ह्यात कचरामुक्त गाव योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी गावोगावी शोषखड्डे, तसेच कचरा प्रकल्पाच्या दृष्टीने तयारी केली जात ...

कचरामुक्त अभियानातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवा
पुणे : जिल्ह्यात कचरामुक्त गाव योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी गावोगावी शोषखड्डे, तसेच कचरा प्रकल्पाच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. हे अभियान व्यापक स्तरावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. तसेच, ग्रामस्थांना येणाऱ्या अचडणी सोडवाव्या अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे व योजनांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा परिषदेत आढावा घेतला. कोरोनाची परिस्थिती व त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व लसीकरणाची माहिती घेतली. यासोबतच अंगणवाडी सुधारणा कार्यक्रमाचा आढावा त्यांनी घेतला.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा परिषद समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प आपण घेतला आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद काय काम करीत आहे? हे अभियान राबिवताना ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवा. एसएसआरएलएमच्या माध्यमातून सुरू कामांना गती द्या, अशा सूचना सुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या सोबतच एक लाख बचत गट स्थापन करण्याच्या कामाच्या प्रगतीची व एक झेडपी, एक प्रोडक्ट यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली.
जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून १०३ गावे टँकरमुक्त करण्यात येत आहेत. टँकरमुक्तीसाठी जलसंधारणाची कामेही वेगाने व्हायला हवी. चवदार तळे योजनेच्या माध्यमातून दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत आजपर्यंत किती कामे झाली आहेत. त्या कामांचा वेग आणखी वाढवत ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे म्हणत डीपीडीसीशी संबंधित असणारे विषय आणि आगामी कार्यक्रमांचा देखील यावेळी सुळे यांनी सविस्तर आढावा घेतला.