सौरऊर्जा प्रकल्पाची होणार चौकशी

By Admin | Updated: September 11, 2015 04:59 IST2015-09-11T04:59:09+5:302015-09-11T04:59:09+5:30

महापालिका इमारतीवर बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच आंदोलन केले.

Solar power project will be investigated | सौरऊर्जा प्रकल्पाची होणार चौकशी

सौरऊर्जा प्रकल्पाची होणार चौकशी

पुणे : महापालिका इमारतीवर बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच आंदोलन केले. महापौरांच्या संमतीने या विषयावर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकल्पाची चौकशी करून कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई करू, असे सांगितले. सभेला सुरुवात होताच श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव वाचून पूर्ण होण्याची वाटही न पाहता मनसेच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहातच या प्रकल्पाच्या विरोधात घोषणा सुरू केल्या.
महापौर दत्तात्रय धनकवडे त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. त्याकडे दुर्लक्ष करून सर्व नगरसेवक महापौरांच्या आसनाजवळ आले व नंतर त्यांनी तेथील रिकाम्या जागेतच ठिय्या दिला. चर्चेला संमती द्या, त्यानंतरच आंदोलन थांबेल, असे त्यांनी सांगितले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अखेरीस महापौरांनी या विषयावर चर्चा करण्यास संमती दिली. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी २३ लाख ४६ हजार रुपयांचा हा प्रकल्प गाजावाजा करून बसवण्यात आला व त्यानंतर गत दीड वर्षे तो बंदच आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. १ लाख रुपयांच्या वीजपंपासाठी हा २३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यातून दीड वर्षात फक्त ३१८ युनिटची वीज निर्मिती झाली, प्रत्यक्षात त्यातून रोज ५५ युनिट वीजनिर्मिती होणे अपेक्षित होते. हे कामच महापालिकेने ठेकेदाराला पैसे मिळावे, यासाठी केले असल्याचा आरोप मोरे यांनी केला.
मोरे यांच्याबरोबरच रूपाली पाटील, बाबू वागस्कर, पुष्पा कनोजिया आदींनीही याविषयावरील चर्चेत भाग घेऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व महापालिकेच्या विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी या सर्व प्रकल्पाची चौकशी करून व दोषींवर कारवाई करू, असे सांगितले. त्यावर आतापर्यंत अशी ६८ आश्वासने प्रशासनाने दिली असून, त्यातील एकही पूर्ण झाले नसल्याचे मोरे, वागस्कर, पाटील यांनी ठासून सांगितले. त्यानंतर येत्या १५ दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करू, असे जगताप यांनी सांगितल्यावर या विषयावरील चर्चा थांबली. (प्रतिनिधी)

Web Title: Solar power project will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.