सामाजिक असमतोल धोकादायक
By Admin | Updated: February 6, 2017 05:54 IST2017-02-06T05:54:19+5:302017-02-06T05:54:19+5:30
जागतिकीकरणात देशात आर्थिक उलाढाल वाढली. परंतु, त्याचा फायदा १५ टक्के श्रीमंतांना झाला. गरीब-श्रीमंतीचा असमतोल दूर झाला नाही.

सामाजिक असमतोल धोकादायक
बारामती : जागतिकीकरणात देशात आर्थिक उलाढाल वाढली. परंतु, त्याचा फायदा १५ टक्के श्रीमंतांना झाला. गरीब-श्रीमंतीचा असमतोल दूर झाला नाही. त्यामुळे भविष्यात देशातील कामगार, दलित, शोषित बंड करून उठेल, हे भारतीय लोकशाहीसमोर मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
बारामतीमध्ये आयोजित रमाई व्याख्यानमालेत मुणगेकर बोलत होते. सतत वाढणारी गरीब-श्रीमंतीची दरी अडचणीची ठरत आहे. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे.
विविध जाती, पंथ, धर्म असताना संसदीय प्रणालीचा आत्मा असणारा हा खंडप्राय देश केवळ राज्यघटनेमुळेच एकसंध आहे. परंतु, अलीकडच्या काळात वाढलेली असहिष्णूता देशासमोर मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचार, धार्मिक तेढ आणि सर्वांत महत्त्वाचे मतदानासाठी मतदाराला पैशाची अपेक्षा ठेवण्याचा प्रकार हा धोकादायक आहे.
याच व्याख्यानमालेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांना प्रसूतीची पगारी रजा देशातील सर्वधर्मीयांबरोबरच शेतकरी, शेतमजुरांचा विचार केला. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी केली. नदीजोड प्रकल्प हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांच्याच काळात मोठी धरणे झाली. नदीजोड प्रकल्प कार्यान्वित झाले असते तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असे ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी या वेळी सांगितले.
डॉ. मंगल ससाणे, प्रा. डॉ. मिलिंद कांबळे, प्रा. डॉ. प्रदीप सरवदे, डॉ. करुणा कांबळे यांचा पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला. त्याचबरोबर माजी प्राचार्य तथा विचारवंत डॉ. एस. पी. कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी पांडुरंग शेलार, प्रा. महेंद्रकुमार साळवे यांची
भाषणे झाली. प्रा. बालाजी कांबळे, प्रा. राजेंद्र चाटसे, प्रा. ज्योती चव्हाण, डॉ. निलकंठ ढोणे, डॉ. विलास आढाव, नगरसेवक सचिन सातव, संजय मोरे, धनपाल भोसले यांच्यासह माता रमाई आंबेडकर प्रतिष्ठानचे
सर्व पदाधिकारी या वेळी
उपस्थित होते. (वार्ताहर)