युती सरकारमुळे बिघडले सामाजिक सौख्य
By Admin | Updated: July 10, 2015 02:33 IST2015-07-10T02:33:20+5:302015-07-10T02:33:20+5:30
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने एका वर्षातच जनतेचा विश्वास गमावला आहे. सातत्याने मंत्र्यांचे घोटाळे समोर येऊ लागल्याने सरकारची कारभारावरील पकड सुटत चालली आहे.

युती सरकारमुळे बिघडले सामाजिक सौख्य
पुणे : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने एका वर्षातच जनतेचा विश्वास गमावला आहे. सातत्याने मंत्र्यांचे घोटाळे समोर येऊ लागल्याने सरकारची कारभारावरील पकड सुटत चालली आहे. सामाजिक सलोखा बिघडत असून, दंगली वाढत चालल्या आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.
केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. यात युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, शरद रणपिसे, उपमहापौर आबा बागूल, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, रमेश बागवे, मोहन जोशी, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, मुख्तार शेख, सुनील शिंदे, युवक अध्यक्ष विकास लांडगे सहभागी झाले होते.
सत्ताधारी मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यावर टीका करतात. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते भाजपावर टीका करीत आहेत. कोणाचाच कोणाला पायपोस नसल्याची विचित्र परिस्थिती आहे. महिला बालकल्याण विभागाने एकाच दिवशी काढलेल्या २०६ कोटींच्या निविदांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी अद्याप दिलेले नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास सभागृृह चालू देणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला. (प्रतिनिधी)