रुग्णवाहिका चालकाने जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:09 IST2021-05-01T04:09:21+5:302021-05-01T04:09:21+5:30
नारायणगाव : कोरोनामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत होत असलेल्यांची संख्याही वाढत चालली आहे. अशा या ...

रुग्णवाहिका चालकाने जपली सामाजिक बांधिलकी
नारायणगाव : कोरोनामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत होत असलेल्यांची संख्याही वाढत चालली आहे. अशा या विदारक परिस्थितीमध्ये मृत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोण अंत्यसंस्कार करणार, असा प्रश्न निर्माण होतोच. पण अशाही परिस्थितीत काही कोरोना योद्धे पुढे येतात अन् सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडतात. नारायणगाव येथील अशाच एका कोरोना योद्ध्याने प्रसिद्धीपासून दूर राहत तब्बल ३३२ कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार केले आहेत. संजय भागुजी भोर असे त्यांचे नाव आहे.
संजय भोर (वय ३८) हे रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांचा आई, बहीण व पत्नी असा परिवार आहे. गेल्या एक वर्षापासून २४ तास नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे ते कार्यरत आहे. वर्षभरापासून नागरिकांच्या डोक्यावर कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. सुरुवातीला कोरोनाग्रस्त आहे असे समजल तर त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला जायचा. जवळचे नातेवाईकही कोरोनाबाधिताजवळ जात नव्हते किंवा मृत झालेल्या जवळच्या व्यक्तीचा अंत्यविधी कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत संजय भोर याचे समाजकार्य सुरु आहे. समाजाला आपलं काही देणं लागतं, या उद्देशाने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांतील ३३२ कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पॅकिंग करून त्यांचे अंत्यविधी केले आहेत.
कोणत्याही प्रसिद्धीची हाव न करता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या वर्षभरापासून संजय भोर हे कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची ने-आण, त्यांना जेवण, पाणी, गोळ्या देणे, ऑक्सिजनच्या टाक्या आणणे, रुग्णांच्या संपूर्ण देखभाली बरोबरच रुग्णालयाची साफसफाईची कामे ते करत आहेत. विशेष म्हणजे एकही रुपयाचा मोबदला न घेता ही सर्व कामे संजय भोर करीत आहे. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आणि कोरोना योद्धा म्हणून खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या संजय भोर यांचे सर्वत्र कौतुक होत असून, नारायणगाव ग्रामस्थांनी तर त्याच्या कार्याला सलाम केला आहे.
३० नारायणगाव भोर