...तर सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना मुंबई-पुण्यात जाऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:06+5:302021-05-14T04:11:06+5:30
-- इंदापूर : राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरमधील काही लोकप्रतिनिधी, चुकीचा आरोप करून बदनाम करत ...

...तर सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना मुंबई-पुण्यात जाऊ देणार नाही
--
इंदापूर : राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरमधील काही लोकप्रतिनिधी, चुकीचा आरोप करून बदनाम करत आहेत. पालकमंत्री पदावरून हटवण्यासाठी कुटील कारस्थाने करत आहेत. परंतु पालकमंत्री भरणे यांना धमक्या दिल्यास सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना पुणे जिल्ह्यातील हद्दीतून पुणे-मुंबईकडे जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील २२ गावे व खडकवासला कॅनॉलमध्ये ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेस सरकारने मान्यता दिली. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांचा वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध मागण्या करत उपविभागीय अभियंता, भीमा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक ४ पळसदेव, येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी सोनावणे बोलत होते.
याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र संघटक अनिल खोत, तेजपृथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात, विकास भोसले, अभिजित गायकवाड, संपत पुणेकर, वैभव भोसले, नीलेश भोसले, माऊली सोनवणे, अजित भोसले, आकाश भोसले आदी उपस्थित होते
सोनवणे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांनी, उजनी धरणातून मराठवाडा, लातूरसाठी केलेली पाणी तरतूद रद्द करण्याची मागणी करावी. तसेच सोलापूर जिल्ह्यात, धरणग्रस्तांना किती जमिनी मिळाल्या याची वस्तुस्थिती काय? याची माहिती मिळावी. तसेच धरणग्रस्तांवर अन्याय करणारे शेतकरी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली.
सोलापूर जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८५ टीएमसी पाणी वापरले. परंतु धरणग्रस्तांना त्या मानाने पाणी वापरासाठी कमी मिळत आहे. तसेच दहा टीएमसी पाणी धरणग्रस्तांना मिळाले पाहिजे व लातूर मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाण्याची केलेली तरतूद रद्द करावी. सध्या ७ टीएमसी पाणी दिले जाते ते बंद करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या नगरपालिका यांना पाणी देण्याच्या नावाखाली जवळपास २५ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून जाते. त्यावेळी कोणीही काही बोलत नाही, मात्र ज्यांच्या हजारो हेक्टर जमिनी उजनी धरणात गेल्या त्या धरणग्रस्तांना हक्काचे पाणी मिळाल्यामुळे, सोलापूरच्या राजकारन्यांच्या पोटात गोळा आला आहे, असाही आरोप संजय सोनवणे यांनी केला आहे.
--
फोटो क्रमाक - १३इंदापूर धरणग्रस्त
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे आंदोलन करताना धरणग्रस्त शेतकरी.