-किरण शिंदे पोलिस दलात शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे पुन्हा एकदा ठणकावून सांगणारी कारवाई पुण्यात झाली आहे. शिस्तप्रिय आणि वर्दीच्या आडून होणारे गैरप्रकार खपवून न घेणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अमितेश कुमार यांनी थेट पोलिस आयुक्तालयात काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस फौजदारावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
प्रवीण विठ्ठल घाडगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. घाडगे हे पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत होते आणि पोलिस आयुक्तालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र, या पदाचा गैरवापर करत त्यांनी गंभीर स्वरूपाचे बेजबाबदार वर्तन केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता एका महत्त्वाच्या गुन्ह्याच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच अर्ज चौकशीमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवरही फोनद्वारे प्रभाव टाकण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हे वर्तन केवळ शिस्तभंगाचेच नव्हे, तर आरोपीविरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईला बाधा आणणारे असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. घाडगे यांचे कृत्य कर्तव्यातील बेफिकिरी, बेजबाबदारपणा आणि पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जनमानसात पोलिसांविषयी नकारात्मक संदेश जाणे, नैतिक अधपतनाचे गैरवर्तन करणे आणि शासकीय सेवेला अशोभनीय ठरणारे गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात शिस्तभंग, दबावगिरी किंवा अधिकारांचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. वरिष्ठ असो वा कनिष्ठ, चुकीचे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
Web Summary : Pune Police suspended an assistant inspector for allegedly misusing his position. He is accused of pressuring officers investigating a case and interfering in inquiries. The action underscores the police's commitment to discipline and zero tolerance for abuse of power.
Web Summary : पुणे पुलिस ने एक सहायक निरीक्षक को पद के दुरुपयोग के आरोप में निलंबित कर दिया। उन पर एक मामले की जांच कर रहे अधिकारियों पर दबाव डालने और पूछताछ में हस्तक्षेप करने का आरोप है। यह कार्रवाई पुलिस की अनुशासन और सत्ता के दुरुपयोग के प्रति जीरो टॉलरेंस की प्रतिबद्धता को दर्शाती है।