चोरटे पकडूनही सोनसाखळ्या लंपास
By Admin | Updated: July 5, 2014 06:23 IST2014-07-05T06:23:17+5:302014-07-05T06:23:17+5:30
ठिकठिकाणची गस्त वाढविली, सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केले, असे असताना पिंपरी-चिंचवड शहरातील सोनसाखळी चोरीचे प्रमाण मात्र कमी होत नाही.

चोरटे पकडूनही सोनसाखळ्या लंपास
मंगेश पांडे, पिंपरी
ठिकठिकाणची गस्त वाढविली, सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केले, असे असताना पिंपरी-चिंचवड शहरातील सोनसाखळी चोरीचे प्रमाण मात्र कमी होत नाही. दररोज एक-दोन तरी सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. विशेषत: दिवसा सोनसाखळी चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे.
सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून, निवासी भागात अधिकाधिक घटना घडल्या आहेत. परिमंडळ तीनमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी या पोलीस ठाण्यांमध्ये दररोज एक-दोन तरी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची नोंद होत आहे.
गुरुवारी पुण्यात पाच सोनसाखळी चोरटे पकडले. याआधीही आठ सोनसाखळी चोरटे पकडले आहेत. चोरटे हाती लागल्यानंतर सोनसाखळी चोऱ्या कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हे प्रमाण वाढतच आहे.
सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची शहरातील महत्त्वाच्या चौकासह ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असते. अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. गस्तही वाढविण्यात आली आहे. महिलांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्ती अधिक चौकशी करीत असल्यास त्या ठिकाणी न थांबता पुढे जावे. संशयित व्यक्ती पाठलाग करीत असल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. घराबाहेर पडताना सोबत कोणाला तरी न्यावे.