स्मार्ट पुण्याचे प्राधान्य वाहतूक प्रश्नालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2015 02:25 IST2015-07-15T01:52:29+5:302015-07-15T02:25:39+5:30

शहर स्मार्ट करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याच्या सूचना पुणेकरांनी कराव्यात, यासाठी पुणे महापालिकेने ‘माझं पुणं, स्मार्ट पुणं’ ही अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे.

Smart Pune priority transport question | स्मार्ट पुण्याचे प्राधान्य वाहतूक प्रश्नालाच

स्मार्ट पुण्याचे प्राधान्य वाहतूक प्रश्नालाच

पुणे : शहर स्मार्ट करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याच्या सूचना पुणेकरांनी कराव्यात, यासाठी पुणे महापालिकेने ‘माझं पुणं, स्मार्ट पुणं’ ही अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. पहिल्याच दिवशी या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, या संकेतस्थळला ६० हजार नागरिकांच्या हिट्स मिळाल्या आहेत. शहराचे प्राधान्यक्रम निश्चित करताना सार्वजनिक वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, असा आॅनलाईन कौल पुणेकरांनी दिला आहे. त्यापाठोपाठ कचरा प्रश्न, शहराची सुरक्षितता, आरोग्य या विषयांचा प्राधान्यक्रम पुणेकरांनी निश्चित केला आहे.
शहरातील कोणत्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात यावे, यावर पुणेकरांचे मत आॅनलाईन पद्धतीने जाणून घेतले जात आहे. पहिल्या दिवशी साडेपाचशेहून अधिक नागरिकांच्या सूचना, शिफारशी, मते महापालिकेला प्राप्त झाली आहेत. स्मार्ट सिटीसाठी सूचना करण्याची संधी सोमवारी रात्री १२ पासून उपलब्ध करून देण्यात आली असून, २० जुलै रोजी रात्री १२ पर्यंत ती सुरू राहील. ‘स्मार्टसिटी डॉट पुणेकॉर्पोरेशन डॉट ओआरजी’ किंवा ‘पुणेस्मार्टसिटी डॉट इन’ या संकेतस्थळांवर आॅनलाईन पद्धतीने मत नोंदविता येईल. तसेच, महापालिकेच्या फेसबुक पेजवरदेखील याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने सूचना पाठविता येणार नाहीत, त्यांना लेखी मत महापालिकेचे उपायुक्त (विशेष), दुसरा मजला यांच्याकडे २० जुलैपर्यंत पाठविता येईल.
शहराच्या विकासाकरिता काय केले पाहिजे, कोणते नियोजन असले पाहिजे, समस्यांच्या सोडवणुकीसाठी काय उपाय योजले पाहिजेत याबाबतच्या सूचना करणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सूचना पाठविणाऱ्यांचा १५ आॅगस्ट २०१५ रोजी महापौर व आयुक्तांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत. उत्कृष्ट सूचना करणाऱ्यांना महापालिकेकडून २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत, तसेच योजनेमध्येही यांचा समावेश केला जाणार आहे.
(प्रतिनिधी)

स्मार्ट पुणेकर
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी शहरातील नागरिकांचा प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये सहभाग असणे, ही महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. पुण्यातील स्वयंसेवी संस्था, संघटना व नागरिकांचा नेहमीच यामध्ये पुढाकार राहिला आहे. स्मार्ट पुण्यासाठी सूचना पाठविण्याच्या स्पर्धेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरून पुणेकर खरोखरच शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी जागृत असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा मेट्रो सिटी योजनेच्या समावेशासाठी होईल. अशी स्पर्धा घेणारे पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे.

Web Title: Smart Pune priority transport question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.