स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाहायला मिळणार
By Admin | Updated: November 28, 2015 00:54 IST2015-11-28T00:54:00+5:302015-11-28T00:54:00+5:30
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने तयार केलेला प्रस्ताव संक्षिप्त स्वरूपात नागरिकांनाही उपलब्ध करून दिला जाणार आहे

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाहायला मिळणार
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने तयार केलेला प्रस्ताव संक्षिप्त स्वरूपात नागरिकांनाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. किमान काही लाख लोकांनी या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, असे प्रशासनाला अपेक्षित असून त्यासाठी मोबाईल, व्हॉट्सअॅप याबरोबरच संकेतस्थळ, टिष्ट्वटर, फेसबुक अशा साधनांचाही उपयोग करून घेतला जाणार आहे.
आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारला हा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. त्यापूर्वी प्रशासनाला हा आराखडा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करून त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. त्याचीही तयारी सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. गेले काही दिवस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक नगरसेवकाबरोबर व्यक्तिश: चर्चा करून त्यांना सर्व प्रस्ताव समजावून सांगण्यात येत आहे व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
मात्र, त्याचबरोबर या योजनेसाठी नागरिकांनी दिलेला सहभागही अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्यासाठीही प्रस्ताव उपलब्ध करून दिला जाणार आहे. अर्थातच त्याचे स्वरूप संक्षिप्त असेल. नागरिकांनी या प्रस्तावाला पाठिंबा देणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध आधुनिक साधनांचा वापर करून घेण्यात येत आहे.
पालिकेच्या ‘पुणेस्मार्टसिटीडॉटइन’ या संकेतस्थळावर हा आराखडा मिळेल. तसेच, ९७६७३००१११ या क्रमाकांवर नागरिकांनी मिस्ड कॉल केला, तर त्यांचा पाठिंबा नोंदविला जाईल. व्हॉट्सअॅपसाठी ९६८९९००००९३ हा क्रमांक आहे.
याशिवाय, महापालिकेने तयार केलेली स्वतंत्र यंत्रणाही यात काम करणार आहे. त्यांच्याकडे एक फॉर्म देण्यात आला असून, ते घरोघरी जाऊन हा फॉर्म नागरिकांकडून भरून घेतील. त्यात ‘या प्रस्तावाला माझा पाठिंबा आहे,’ असा मजकूर आहे. तसेच, शहरातील ४१ पेक्षा जास्त संस्थांशी महापालिका जोडली गेली आहे. त्यांच्या सदस्यांकडेही हे फॉर्म पाठविण्यात येतील. किमान ६ ते ७ लाख नागरिकांकडून प्रस्तावाला पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा कुणाल कुमार यांनी व्यक्त केली.
बार्सिलोना येथे स्मार्ट सिटीसाठी काम करणारे जगभरातील लोक आले होते. त्या सर्वांनाच भारत सरकारच्या या स्मार्ट सिटी योजनेबाबत उत्सुकता आहे.
पुण्याच्या दृष्टीने विविध समस्यांवरच्या स्मार्ट सोल्युशनसाठी एक प्रयोगशाळाच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटनमधील
एका कंपनीचे साह्य त्यासाठी
मिळेल. विविध गोष्टींसाठी आता तंत्रज्ञान उपलब्ध असून, त्याचा
वापर करून घ्यायला शिकले पाहिजे, असे मत आयुक्तांनी या वेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)