मावळात सहा महिन्यांत सहावा बळी
By Admin | Updated: December 9, 2015 00:16 IST2015-12-09T00:16:59+5:302015-12-09T00:16:59+5:30
संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित मावळच्या भूमीत मागील काही काळापासून उदयास आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता यांमुळे राजकीय क्षेत्रातील खुनाच्या

मावळात सहा महिन्यांत सहावा बळी
लोणावळा : संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित मावळच्या भूमीत मागील काही काळापासून उदयास आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता यांमुळे राजकीय क्षेत्रातील खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे़ गेल्या सहा महिन्यांत सहा खून झाले. त्यातील चार राजकीय कारणांवरून झाले आहेत.
छत्रपती शिवरायांच्या बारा मावळांपैकी प्रमुख असलेल्या मावळ तालुक्याला संतांच्या वास्तव्याचा मोठा इतिहास आहे़ मुंबई व पुणे या मोठ्या शहरांच्या मध्यावर वसलेला तालुका असा नावलौकिक असलेल्या मावळात काही काळापासून खुनाच्या घटनांमुळे गालबोट लागले आहे़ युवा पिढीमध्ये वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधून आलेली आर्थिक सुबत्ता, खालावलेली वैचारिकता व संवादाकडून विसंवादाकडे जाणारी पाळेमुळे यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़ राजकारणात मोठे पद मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे इथपर्यंत सर्व ठीक आहे़ मात्र त्यामधून एखाद्या व्यक्तीला संपवून टाकणे हे कितपत योग्य आहे़ पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध चालतात. मात्र, मावळच्या भूमीत आजपर्यंत कोणीही असा प्रयत्न केला नव्हता. त्याचे महत्त्वाचे कारण राजकीय वाद, पक्ष काही असले, तरी मावळासाठी सर्वजण एकदिलाने व एकविचाराने काम करीत होते़ मात्र तीच वैचारिकता कमी होऊ लागली असल्याचे अलीकडील घटनांवरून दिसू लागले आहे़ जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधून आलेली सुबत्ता व चंगळवादी होत असलेली युवा पिढी यांना हाताशी धरत मागील काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एक गँगने मावळात पाय रोवण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळण्यात काही प्रमाणात यश आले़ असे असले, तरी संवादाकडून विसंवादाकडे सुरू असलेली वाटचाल यामुळे मावळात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़
एखाद्या घटनेला पार्श्वभूमी काही जरी असली, तरी जय व पराजय पचविण्यासाठीची खिलाडू वृत्ती कमी झाली असल्याचे यावरून अधोरेखित होत आहे़ मावळ हा मावळ्यांचा, जिगरबाजांचा, कर्तृत्ववान व्यक्तींचा, संतांचा भाग आहे. या ठिकाणी खून व खुनाचा प्रयत्न यासारख्या
घटना शोभनीय नाहीत़ या घटना वेळीच रोखणे गरजेचे आहे़ निवडणुका व आर्थिक सुबत्ता येत-जात असतात. मात्र, या गोष्टीकडे पाहण्याची संकुचित दृष्टी बदलणे गरजेचे आहे़ वादातून वाद घालण्याऐवजी संवादातून समतोल साधणे गरजेचे आहे़
मावळात मागील सहा महिन्यात सहा खून झाले आहेत़ यापैकी चार राजकीय वादांमधून, तर दोन
वैयक्तिक कारणांवरून झाले आहेत़ अशा घटना वेळीच रोखणे
गरजेचे आहे़ राजकीय वादातून खुनाच्या घटना, तसेच भांडणांचे प्रकार वाढले आहेत.(वार्ताहर)