बारामती : व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडूनही जातीय दुजाभावाचा सामना करावा लागलेल्या उज्वला गायकवाड या महिलेने बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाईची मागणी करत बारामती प्रशासकीय भवनासमोर सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. गायकवाड यांनी बारामतीतील बँक ऑफ बडोदा शाखेतून २०१५ मध्ये व्यवसायासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची पूर्णपणे फेड करूनही, हारवेस्टरसाठी नव्या कर्जाची मागणी केल्यावर बँक अधिकाऱ्यांनी जातीय टिप्पणी करत कर्ज नाकारल्याचा आरोप आहे. गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, बँकेचे तत्कालीन मॅनेजर ललीत निनाजी नाळे, किरण जाधव आणि विवेकसिंग चांदुलय यांनी त्यांना हीन वागणूक दिली. बारामती शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल झाली असली, तरी अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधातही कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी उज्वला गायकवाड यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांना विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.
हीन वागणुकीविरोधात सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:12 IST