खड्डयांमुळे सहा दुचाकीस्वार जखमी
By Admin | Updated: August 11, 2014 04:02 IST2014-08-11T04:02:25+5:302014-08-11T04:02:25+5:30
या बाबीचे गांभीर्याने दखल घेऊन पेठ येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन ते तीन फूट लांब रुंदीचे व एक फुटापेक्षा जास्त खोलीचे धोकादायक खड्डे मुरूम व माती आणून बुजविले.

खड्डयांमुळे सहा दुचाकीस्वार जखमी
पेठ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेपवाईमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) परिसरात अन्नपूर्णा ढाब्याच्या रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार जखमी झाले. या बाबीचे गांभीर्याने दखल घेऊन पेठ येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन ते तीन फूट लांब रुंदीचे व एक फुटापेक्षा जास्त खोलीचे धोकादायक खड्डे मुरूम व माती आणून बुजविले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ परिसरातील रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठ्या जिकिरीचे काम होते. पेठनजीक अन्नपूर्णा ढाब्याच्या परिसरातील रस्त्यावर गेल्या वर्षी येथील पडलेल्या खड्ड्यात राजगुरुनगर येथील एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्याला स्वत:चे पाय गमवावे लागले होते. या परिसरात रस्त्यावर मध्यभागी, तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खूप मोठे खड्डे पडले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून या खड्ड्यांच्या जागेवर रात्रीच्या वेळी पाच ते सहा दुचाकीस्वार जखमी झाले आहे. या रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या संजय ढमाले यांनी सांगितले, की शुक्रवारी (दि. ०८) रात्री आठ ते दहाच्या दरम्यान पाच ते सहा दुचाकीस्वार अंदाज न आल्यामुळे खड्ड्यात पडले. या सर्वांना बाजूला घेऊन मदत केली. त्यामुळे पेठ ग्रामस्थांनी धोकादायक खड्डे बुजविण्याचा निश्चय केला.
अर्जुन मोरडे यांनी आपल्या स्वत:च्या छोटा हाथी या वाहनामध्ये मुरूम व माती आणून खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थ सुरेश धुमाळ, संजय ढमाले, बाळासाहेब ढमाले, जमादार तांबोळी, दिगंबर ढमाले, खंडू पवार, सुनील मोरडे यांच्या मदतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकामी पुढाकार घेतला.
येणाऱ्या-जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनचालकांनी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)