सरपंचाच्या नातेवाइकाची ग्रामसभेला उद्देशून शिवीगाळ
By Admin | Updated: October 7, 2016 03:51 IST2016-10-07T03:51:00+5:302016-10-07T03:51:00+5:30
सरपंच शीतल लोंढे यांच्या घरातील व्यक्ती नितीन लोंढे यांनी शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी

सरपंचाच्या नातेवाइकाची ग्रामसभेला उद्देशून शिवीगाळ
राजेगाव : येथील ग्रामसभेला उद्देशून सरपंच शीतल लोंढे यांच्या घरातील व्यक्ती नितीन लोंढे यांनी शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर
कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांना निवेदन दिले आहे.
गांधी जयंतीनिमित्त येथील राजेश्वर मंदिरात प्रवीण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होती. या वेळी वाद होऊन नितीन लोंढे यांनी ग्रामसभेला उद्देशून शिवीगाळ करून सभा दडपण्याचा प्रयत्न केला.
यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि घरातील व्यक्तींनी ग्रामसभेला शिवीगाळ केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून लोंढे यांनी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. या वेळी निषेधसभा घेण्यात आली. त्यानंतर दौंड पंचायत
समितीचे सहायक गटविकास अधिकारी गुळवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कारवाई
करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यामुळे ग्रामपंचायतीचे टाळे
काढण्यात आले.
ग्रामसभेत असला कसलाही प्रकार झालेला नसून क्षुल्लक विषयाचे राजकारण करण्यात आले आहे. आपल्या घरातील व्यक्तीवर हे खोटे आरोप केले आहेत. मी महिला सरपंच असल्याने गावातील काही व्यक्ती गोंधळ घालून राजकारणातून जाणीवपूर्वक प्रत्येक ग्रामसभेला अडचण आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.
- शीतल लोंढे, सरपंच
ग्रामसभा उधळून लावण्यासाठी केलेला हा पूर्वनियोजित कट होता. दोन दिवसांत दोषींवर योग्य ती कारवाई केली नाही तर ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
- सचिन खैरे, रासपाचे युवकाध्यक्ष, दौंड तालुका