ढेकणांनी थांबविली सिद्धेश्वर एक्स्प्रेस
By Admin | Updated: February 4, 2015 00:21 IST2015-02-04T00:21:01+5:302015-02-04T00:21:01+5:30
मुंबईहुन सोलापुरकडे निघालेली सिध्देश्वर एक्सप्रेस रात्री पावणे तीनच्या सुमारास पुणे स्थानकात येते... एसी डब्ब्यात बसलेले दोन ज्येष्ठ नागरिक गाडीत गोंधळ घालण्यास सुरूवात करतात...

ढेकणांनी थांबविली सिद्धेश्वर एक्स्प्रेस
पुणे : मुंबईहुन सोलापुरकडे निघालेली सिध्देश्वर एक्सप्रेस रात्री पावणे तीनच्या सुमारास पुणे स्थानकात येते... एसी डब्ब्यात बसलेले दोन ज्येष्ठ नागरिक गाडीत गोंधळ घालण्यास सुरूवात करतात... स्थानकातून सुटण्याची वेळ होवूनही एक्सप्रेस हालत नाही... त्यामुळे अधिकारी, कर्मचारी अन् पोलिसांचीही धावपळ उडते... दोन्ही बाजुने गडबड सुरू झाल्याने गोंधळात आणखीन भर पडते... त्यात एक्सप्रेसला तब्बल दोन तास उशीर होतो... या प्रकारामागे ढेकणांचा ‘हात’ असल्याचा खुलासा नंतर होतो अन् इतर प्रवासीच ज्येष्ठांवर तोंडसुख घेतात.
सोलापुरला जाणारी सिध्देश्वर एक्सप्रेस पुणे स्थानकातून पुढे जाते. ही गाडी मंगळवारी पहाटे २.४७ वाजता पुणे रेल्वे स्थानकात पोहचली.
मुंबईहून सोलापुरला जाणारी सिध्देश्वर एक्सप्रेस मध्यरात्री २.४८ वाजता पुणे रेल्वे स्थानकात येते. त्यावेळी रेल्वेतील एसी ३ डब्ब्यातील दोन ज्येष्ठ नागरिक गाडी थांबल्यानंतर जागेवर उठून आरडाओरडा करण्यास सुरूवात करतात. ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे ढेकूण असल्याने ते संतप्त झाले होते. रेल्वे प्रशासनाकडून त्यावर कोणतेही उत्तर मिळत नसल्याने त्यांनी गाडी स्थानकातून पुढे जावू न देण्याची भुमिका घेतली. त्यामुळे दोन तास गाडी स्थानकातच उभी राहिली. दोघांची बराच वेळ समजुत घातल्यानंतर हाटे ४.४८ वाजता एक्सप्रेस हिरवा कंदील मिळाला. (प्रतिनिधी)
ढेकूण असतील, तर ते सोलापूर स्थानकात काढले जातील, असे दोन्ही प्रवाशांना समजविण्यात आले. इतर प्रवाशांना त्रास देणे योग्य नाही. यातील एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा त्यांना जामिनावर सोडण्यात आले. रेल्वेबाबत काही समस्या असल्यास त्याची तक्रार लेखी स्वरूपात देता येते. तसेच त्याबाबत टीटी किंवा स्टेशन मास्तरलाही सांगता येते.
-वाय. के. सिंग,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे प्रशासन
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे प्रवासी भाजपाचे खासदार किरीट सोमैया यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत होते. गोंधळ वाढल्यानंतर त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी बोलून अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची धमकी दिली. त्यामुळे अधिकारीही घाबरून गेले होते. त्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोंधळाच्या ठिकाणी पाठवून प्रकरणाची माहिती घेण्याचे आदेश दिले. दोन्ही ज्येष्ठ नागरिकांच्या गोंधळामुळे इतर प्रवाशांची मात्र झोपमोड झाली. डब्ब्यात ढेकूण असल्याचे विचारणा त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी ढेकूण नसल्याचे सांगितले. त्यामुळे अन्य प्रवासीही दोघांवर चिडले होते.