शहरातील एटीएमचे ‘शटर डाऊन’च
By Admin | Updated: November 16, 2016 02:24 IST2016-11-16T02:24:02+5:302016-11-16T02:24:02+5:30
येथे निगडी-तळवडे रस्त्याच्या कडेने रुपीनगर परिसरात विविध बँकाची एटीएम सेंटर आहेत. लोकांनी शंभराच्या नोटा काढण्यासाठी एटीएमच्या

शहरातील एटीएमचे ‘शटर डाऊन’च
तळवडे : येथे निगडी-तळवडे रस्त्याच्या कडेने रुपीनगर परिसरात विविध बँकाची एटीएम सेंटर आहेत. लोकांनी शंभराच्या नोटा काढण्यासाठी एटीएमच्या बाहेर रांगा लावल्या. त्यानंतर अल्पावधीतच एटीएममधील नोटा संपून गेल्या आणि एटीएम बंद पडली.
बंद पडलेली एटीएम अद्यापही सुरू झाली नाहीत. त्यामुळे पैशासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही मोजक्या ठिकाणी एटीएममध्ये नोटा उपलब्ध करण्यात आल्या. परंतु ज्या ठिकाणी एटीएममध्ये पैसे असतील, तेथे रुपये काढण्यासाठी लगेचच लांबलचक रांगा लागतात आणि अल्पावधीत नोटा संपून जात आहेत.
तळवडे आणि रुपीनगर परिसरात एचडीएफसी, अॅक्सिस, बँक आॅफ महाराष्ट्र, देना बँक, इंडिकॅश अशा विविध बँकांची एटीएम आहेत. यापैकी काही बँकांनी थोड्याफार नोटा ठेवून ग्राहकांची सोय करण्याचा प्रयत्न केला. पण बहुतांश बँकांचे प्रतिनिधी इकडे फिरकलेही नाहीत. तसेच सदर बँकांनी एटीएममध्ये नोटा उपलब्ध करून दिल्या नाहीत. एटीएम सुरु होईल आणि रुपये मिळतील या आशेने नागरिक एटीएमला पहारा देत असल्याचे निदर्शनास आले. यात परप्रांतीय नागरिकांची संख्या जास्त आहे.
कामधंदा सोडून एटीएम सेंटरच्या बाहेर बसून रुपये मिळतील, या आशेने एटीएम सेंटरवर पाळत ठेवण्याची वेळ आली असल्याचे एका नागरिकाने सांगितले.
बँकेत गेल्यावर दोन हजारांची नोट हातात टेकवली जाते. दुकानात गेल्यास पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारत नाहीत, तर दोन हजारांची नोट घेतली, तरीही सुट्या पैशाचा प्रश्न उभा राहतो. एटीएम बंद आहेत. शंभराच्या नोटांचा तुटवडा आहे, तर पाचशेची नवीन नोट अजूनही बाजारात उपलब्ध नाही. खिशात हजार आणि पाचशेच्या नोटा असून त्यांना किंमत नाही. त्यामुळे किरकोळ व्यवहार ठप्प झाले आहेत. स्थानिक रहिवाशांचे उधारीचे व्यवहार व्यवस्थित सुरू आहेत. परप्रांतीय व्यक्तींना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. (वार्ताहर)