श्रीमंत महापालिका भंगार विक्रीतही ‘श्रीमंत’

By Admin | Updated: July 3, 2015 23:54 IST2015-07-03T23:54:28+5:302015-07-03T23:54:28+5:30

एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार

Shrimant municipal corporation scam sells 'rich' | श्रीमंत महापालिका भंगार विक्रीतही ‘श्रीमंत’

श्रीमंत महापालिका भंगार विक्रीतही ‘श्रीमंत’

अंकुश जगताप , पिंपरी
पिंपरी : एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आधीच श्रीमंत असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भंगार विक्रीतूनही मालामाल झाल्याचे बोलले जात आहे.
शहरामध्ये विविध प्रभागांच्या अखत्यारीत असणाऱ्या भागामध्ये वेळोवेळी जुने साहित्य, यंत्रसामग्री बदलून त्या जागी नूतनीकरण केले जात आहे. त्यामध्ये जुने पथदिवे बदलण्याच्या कामाचा धडाका सर्वत्र राबविला जात आहे. त्यासाठी केवळ पथदिवेच नाही, तर आधीचे संपूर्ण खांबच बदलले जात आहेत. शहरभरात मागील २ वर्षांत बहुतांश प्रभागांमधील पथदिव्यांचे खांब बदलले आहेत. असे खांब आणि विद्युत बल्ब, इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचे ढीग पालिकेच्या भांडार विभागात जमा झाले.
मागील काही वर्षांमध्ये शहरात अतिक्रमण विभागाकडून विविध ठिकाणी जोरदार कारवाई करण्यात आली आहे. शहरभरात जाहिरातफलकांचा सुळसुळाट वाढला आहे. अशा फलकांवर सध्या शहरभर कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यात जाहिरातफलकांच्या लोखंडी चौकटी काढून त्या जप्त केल्या जात आहेत. विविध प्रभागांच्या आवारात अशा भंगारात काढलेल्या चौकटींचे ढीग पडत आहेत. दुसरीकडे शहरभरातील टपरी-पथारीवाल्यांवरही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पाणीपुरवठा विभागातर्फे मागील काही वर्षांमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेतच्या जलउपसा केंद्रापासून ते निगडीपर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलली आहे. यासह अनेक प्रभागांमधील लहान-मोठ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अथवा नूतनीकरण करण्यात आल्याने जुन्या जलवाहिन्या भंगारात निघाल्या आहेत. याचबरोबर पंपसेट, पाणीवितरणाचे व्हॉल्व्ह यासह विविध विभागांमधील फर्निचर, शाळांमधील बाकडे, कार्यालयीन वस्तू व उपकरणांचाही त्यामध्ये समावेश आहे. कालबाह्य झालेल्या वाहनांचे टायर, ट्यूब, गिअर बॉक्स व भंगारात निघालेल्या विविध साहित्याचीही त्यामध्ये भर पडली आहे. मागील २ वर्षांमध्ये साठलेल्या अशा साहित्याचा लिलाव केला.

चालू आर्थिक वर्षातील प्रलंबित लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या वर्षी अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई करून साहित्य जप्त केले आहे. इतर विभागांकडूनही साहित्य जमा झाले आहे. त्याची लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिका सभेपुढे हा विषय मान्यतेसाठी आहे. दोन महिन्यांत हा लिलावही पूर्ण होईल. त्यातून महापालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे.
- दिलीप गावडे (भांडार व्यवस्थापक, पिंपरी-चिंचवड महापालिका)

Web Title: Shrimant municipal corporation scam sells 'rich'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.