श्रीक्षेत्र वढू-तुळापुरात शंभुभक्तांची मांदियाळी

By Admin | Updated: March 20, 2015 23:01 IST2015-03-20T23:01:49+5:302015-03-20T23:01:49+5:30

धर्मवीर श्रीछत्रपती संभाजी महाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर अलोट गर्दी केली होती.

Shrikhetra Vadhu-Tulapur | श्रीक्षेत्र वढू-तुळापुरात शंभुभक्तांची मांदियाळी

श्रीक्षेत्र वढू-तुळापुरात शंभुभक्तांची मांदियाळी

कोरेगाव भीमा : धर्मवीर श्रीछत्रपती संभाजी महाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर अलोट गर्दी केली होती. या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावर्षीपासून शासकीय मानवंदनाही देण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी श्रीक्षेत्र वढू बुद्रुकची ‘आदर्श ग्राम दत्तक’ योजनेत निवड केल्याचे जाहीर केल्याने समाधिस्थळाचा विकास होण्यास मदत होईल.
वढू बुद्रुक ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमप, तहसीलदार रघुनाथ पोटे, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, सरपंच प्रफुल्ल शिवले, नगरसेवक महेंद्र पठारे, बाळासाहेब खैरे उपस्थित होते.
या वेळी दरवर्षीप्रमाणे समाधिस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिलेल्या आदेशानुसार समाधिस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंंदना दिली. या वेळी संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक-तुळापूर असा पालखीसोहळा वढू बुद्रुक येथे आल्यानंतर सरपंच प्रफुल्ल शिवले व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
पुष्पवृष्टीनंतर झालेल्या सभेस प.पू. १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सुदर्शन वाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके, स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे उपस्थित होते. स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार यावर्षी धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज शंभूसेवा पुरस्कार सुरेश चव्हाणके, शंभूभक्त डी. डी. भंडारे पुरस्कार बेळगाव श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर, शंभूभक्त अशोक भंडलकर पुरस्कार संतोष शिंदे, शंभुभक्त बाळासाहेब आरगडे पुरस्कार दत्ता सोनवणे, शंभुभक्त गेणू गणपत शिवले पुरस्कार वाल्मीक पोपट शिंदे व सहकारी, शंभुभक्त विवेक घाटपांडे पुरस्कार शिवप्रतिष्ठान सुरवसी (ता. फलटण, जि. सातारा), शंभुभक्त अरुण गायकवाड प्रशांत धनवडे व अक्षय दळवी (कोळशी, ता. फलटण, सातारा) यांना देण्यात आला .

वढु बुद्रुक होणार आमदार आदर्श ग्राम
शंभू छत्रपतींच्या समाधिस्थळाचा कालबद्ध विकास करण्यासाठी ‘आदर्श संसद ग्राम’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘आदर्श ग्राम दत्तक’साठी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक या स्थळाचा समावेश करण्याची सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केलेली मागणी आमदार पाचर्णे यांनी तत्काळ मंजूर केली.

४शिरूर-हवेली दिंंडीच्या वतीने तुळापूर ते वढू पालखी काढण्यात आली होती, तर तलवारबाजीचे प्रात्यक्षिकही या वेळी सादर करण्यात आले. या वेळी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या २६ घराण्यांच्या वंशजांनी रक्तदान करून राजांना अभिवादन केले. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या वतीने शंभुभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले.

Web Title: Shrikhetra Vadhu-Tulapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.