भोर: सुमारे ३०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या भोरच्या संस्थानिकांच्या राजप्रसादातील दरबार सभागृहात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरबार सभागृहात भक्तांची मोठी उपस्थिती होती.
सकाळी ११ वाजता राजप्रसादातून राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती नागरिक बँड व गायन-वादनाच्या साथीने राममूर्ती आणण्यासाठी सोनाराकडे गेले. त्यानंतर राममूर्ती पालखीतून उत्साही मिरवणुकीने राजप्रसादात आणण्यात आली. या वेळी नागरिकांनी राममूर्तीवर पुष्पवृष्टी केली. राजप्रसादात मूर्ती सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली.
यावेळी मधुकर पैठणकर व विजय दुसांगे यांनी राम आख्यायिका सांगितली. तबला वादन शिवाजी तामकर, झांज वादन प्रीती शहा, प्रियंका म्हसवडे, ऋषिकेश वैद्य यांनी केले, तर गायन सेवा सुधीर शिरवले यांनी सादर केली. दुपारी बरोबर १२ वाजता राजेशराजे पंतसचिव, त्यांचे बंधू व पुत्र यांनी पाळण्याची दोरी ओढताच श्रीरामाच्या जयघोषाने दरबार सभागृह दणाणून गेले. उपस्थितांनी पाळण्यावर पुष्पवृष्टी केली. या वेळी हजारो नागरिकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.
श्रीराम हे भोरच्या संस्थानिक पंतसचिवांचे कुलदैवत असल्याने १७२० सालापासून श्रीराम जन्मोत्सव व सचिवपदाचे संस्थापक शंकर नारायण यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही भव्य आणि वैभवशाली पद्धतीने कायम ठेवण्यात येत आहे. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भोर शहरात पहाटेपासूनच उत्सवी वातावरण होते. घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर व्यापाऱ्यांनी कमानी उभारून शहर सजवले होते. राजवाडा परिसरात विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच राजबागेतील कुस्ती आखाड्यात नामांकित पैलवानांनी हजेरी लावली असून हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
दरम्यान, भोर शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या कारी येथील सरदार कान्होजी यांच्या वाड्यातही पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी जेधे घराण्याचे १४ वे वंशज रणधीर जेधे, युवराज जेधे, इंद्रजीत जेधे, चिमाजी जेधे आदी उपस्थित होते.
Web Summary : Bhor's historic Ram Janmotsav, a 300-year-old tradition, was celebrated with fervor. The Ram Navami procession, palace rituals, and the symbolic cradle ceremony marked the event, preserving a rich historical legacy.
Web Summary : भोर का ऐतिहासिक राम जन्मोत्सव, 300 साल पुरानी परंपरा, धूमधाम से मनाया गया। रामनवमी जुलूस, महल की रस्में और प्रतीकात्मक पालना समारोह ने इस आयोजन को चिह्नित किया, जो एक समृद्ध ऐतिहासिक विरासत को संरक्षित करता है।