श्रीपाल सबनीसांचे वक्तव्य खेदजनक
By Admin | Updated: January 2, 2016 08:36 IST2016-01-02T08:36:53+5:302016-01-02T08:36:53+5:30
एक अमराठी भाषा ज्ञानभाषा असल्याची भलावण करणारी अनावश्यक आणि अनुचित टिप्पणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

श्रीपाल सबनीसांचे वक्तव्य खेदजनक
पुणे : एक अमराठी भाषा ज्ञानभाषा असल्याची भलावण करणारी अनावश्यक आणि अनुचित टिप्पणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. सबनीसांच्या वक्तव्याचा खेद वाटत असून त्यांनी या पुढे जबाबदारीचे भान राखून औचित्य सांभाळावे, असे आवाहन मराठी राष्ट्रभाषा समितीचे अध्यक्ष, मराठी माध्यम संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष अनिल गोरे यांनी केले आहे.
पिंपरी येथे होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सबनीस यांची निवड झाली आहे. याचे भान राखून त्यांनी मराठी या आपल्या सध्याच्या तात्पुरत्या पदाशी संबंधित भाषेबाबत विचार सातत्याने प्रदर्शित करावेत आणि अन्य कोणत्या भाषा ज्ञानभाषा आहेत, याची उठाठेव या पदावरून उतरल्यावर करावी. ही अपेक्षा वैयक्तिक पातळीवर नसून पदाशी संबंधित औचित्याचे भान बाळगावे, असे मत गोरे यांनी व्यक्त केले आहे.
मराठीच्या परिघातील कार्यक्रम आणि उपक्रमांच्या प्रसंगी अन्य अमराठी भाषेचे गोडवे गाण्याचा उपक्रम सबनीस यांच्याप्रमाणेच अन्य अनेक मराठी साहित्यिकांनी मराठीचा प्रसार, प्रचाराशी संबंधित मोठे पद मिळाल्यावर यापूर्वीही केला आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषिक संस्थांचे, संमेलनाचे पदाधिकारी अशी अन्य भाषांची उठाठेव त्या पदावरून करीत नाहीत, असा अनुभव असल्याचे नमूद करून गोरे यांनी म्हटले आहे, की मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी संबंधित संस्थेत, उपक्रमात मोठे पद मिळाल्यावर अकारण अन्य भाषेचे गोडवे गाणे हे मराठीच्या विकासाला मारक आहे. सबनीस यांनी अशी घातक प्रथा थांबवावी, असे मित्र म्हणून आवाहन करीत आहे.