पुणे : श्रावण महिन्यात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाकडून विशेष यात्रा बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये साडेतीन शक्तिपीठासह अष्टविनायक यात्रा, गाणगापूर, अक्कलकोट, आदमापूर, नरसोबाची वाडी, गोंदवले यांसह अन्य देवस्थान दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. तरी भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे एसटी विभागाने केले आहे.
श्रावण महिना सुरू होताच देवस्थानाला जाण्याचे भाविकांचे प्रमाण वाढते. काही भाविक ग्रुपने बुकिंग करून देवदर्शन करतात. या भाविकांचे देवदर्शन आणि प्रवास सुरक्षित, सुखकर व्हावा यासाठी एसटीकडून यंदाही दि. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान विशेष दर्शन यात्रांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येणार असून, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनाही सवलतीत प्रवास करता येईल. त्यामध्ये चहा, नाश्ता, जेवण, निवास याची व्यवस्था असून, या सर्व विशेष यात्रा बस स्वारगेट आगारातून सोडण्यात येतील. त्यामध्ये निम आराम आणि साधी बसची व्यवस्था केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
या आहेत यात्रा विशेष बस :
- अष्टविनायक दर्शन : (दि. १३ आणि १४ ऑगस्ट)
- गोंदवले, शिखर शिंगणापूर दर्शन : (दि. १५ ऑगस्ट रोजी)
- आदमापूर (बाळूमामा), कोल्हापूर महालक्ष्मी, नरसोबाची वाडी, खिद्रापूर दर्शन : (दि. १६ आणि १७ ऑगस्ट)
- गाणगापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन : (दि. १६ आणि १७ ऑगस्ट)
- गणपतीपुळे, डेरवन, पावस आणि मार्लेश्वर दर्शन : (दि. १९ आणि २० ऑगस्ट)
- कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, संप्तशृंगी ही साडेतीन शक्तिपीठे : (१८ ते २१ ऑगस्ट)
श्रावणात भाविकांना देवदर्शनासाठी सोय व्हावी. शिवाय सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी साडेतीन शक्तिपीठांसह अष्टविनायक यात्रा, गाणगापूर, अक्कलकोट यांसह इतर ठिकाणी बस सोडण्यात येणार आहेत. याचा प्रवासी आणि भाविकांनी लाभ घ्यावा. -जयेश पाटील, वरिष्ठ आगारप्रमुख, स्वारगेट