बजरंगवाडी येथे दुकानाला आग
By Admin | Updated: April 14, 2017 04:17 IST2017-04-14T04:17:58+5:302017-04-14T04:17:58+5:30
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या बजरंगवाडी येथे भंगाराच्या दुकानाला सायंकाळी भीषण आग लागून त्यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे

बजरंगवाडी येथे दुकानाला आग
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या बजरंगवाडी येथे भंगाराच्या दुकानाला सायंकाळी भीषण आग लागून त्यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव येथील भंगाराच्या गोडाऊनला ८ दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी शिक्रापूर येथील रज्जाक खान (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या भंगाराच्या गोडाऊनला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर आगीचे लोळदेखील वाढू लागले, तसेच आगीचा धूरदेखील खूप अंतरावर पसरू लागला. येथे आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, महेंद्र शिंदे, संदीप जगदाळे, सुरेश डुकले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या वेळी धुराचे लोट इतके पसरले होते, की रस्त्याने वाहनचालकांनादेखील दिसणे कठीण झाले होते. यानंतर येथील पंकज बोबडे, हरिभाऊ ढमढेरे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सासवडे, सचिन सासवडे, प्रशांत तरटे, स्वप्निल टोणगे, पप्पू सासवडे, फिरोजभाई, संतोष सासवडे, नितीन सासवडे व इतर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आगीचे लोळ वाढल्याने आग विझविणे कठीण झाले होते. बंब येथे पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना एका तासाच्या अथक परिश्रमाने आग विझविण्यात यश आले. चार ते पाच लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले होते.(वार्ताहर)