चेकपोस्टच्या नावाखाली ‘दुकानदारी’
By Admin | Updated: March 23, 2015 00:46 IST2015-03-23T00:46:57+5:302015-03-23T00:46:57+5:30
सार्वजनिक वाहनांकडून ५० रुपये प्रवेश शुल्क वसूल करण्यासाठी १३ ठिकाणच्या चेकपोस्टला परवानगी दिली असताना प्रत्यक्षात ठेकेदाराकडून १६ ठिकाणी चेकपोस्ट लावून वसुली केली जात आहे.

चेकपोस्टच्या नावाखाली ‘दुकानदारी’
दीपक जाधव ल्ल पुणे
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या सार्वजनिक वाहनांकडून ५० रुपये प्रवेश शुल्क वसूल करण्यासाठी १३ ठिकाणच्या चेकपोस्टला परवानगी दिली असताना प्रत्यक्षात ठेकेदाराकडून १६ ठिकाणी चेकपोस्ट लावून वसुली केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज लाखो रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरामध्ये लष्कराचे दक्षिण मुख्यालय आहे, लष्कराच्या संस्था असलेला परिसराचा कारभार त्यांच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून चालविला जातो. रस्त्याच्या देखभालीकरिता म्हणून कॅन्टोन्मेंटकडून प्रवासी बस, ट्रक, टेम्पो, अॅटो रिक्षा, ट्रॅक्टर या सार्वजनिक वाहनांकडून ५० रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वामी समर्थ इंजिनिअर्स, भवानी पेठ या कंपनीस वर्षाला १० कोटी १२ लाख रुपयांना प्रवेश शुल्क गोळा करण्याचा ठेका दिला आहे. ४ नोव्हेंबर २०१४ ते ३ नोव्हेंबर २०१५ या कालावधीसाठी हा ठेका देण्यात आला आहे.
ठेकेदार दररोज लाखो रुपये या प्रवेश शुल्कातून गोळा करीत आहे. त्याला शहरातील इम्प्रेस गार्डन (पुणे ते सोलापूर रस्ता), इम्प्रेस गार्डनच्या मागे (सोलापूर ते पुणे रस्ता), आरटीसीच्या मागे (पुणे ते सोलापूर रस्ता), एएफएमसी मुलांचे हॉस्टेल (सोलापूर ते पुणे रस्ता), बाजीराव नाला पोलीस चौकीजवळ, नेताजीनगर, शैलेश्वर अर्पाटमेंट (फातिमानगर ते साळुंके विहार), सीटीसी पर्वती व्हिला रोड, सीडीए एक्झिट पाँइट, मथुरावाला स्पोर्ट ग्राऊंड (वानवडी बाजार), घोरपडी बाजाराजवळ (आर्मी स्पोर्टस् ग्राऊंड), शंकरशेठ रोड (धोबी घाट), रेल्वे क्रॉसिंग (घोरपडी गाव) या १३ ठिकाणी प्रवेश शुल्क वसुलीला परवानगी दिली आहे.
परवानगी दिलेल्या या ठिकाणांव्यतिरिक्त फातिमानगर चेकपोस्टच्या समोर, गोळीबार मैदान ते कोंढवा रस्त्यावर सीटीसीसमोर, पुना कॉलेज चौक या ठिकाणी बेकायदेशीरपणे ठेकेदाराकडून प्रवेशशुल्क वसुली केली जात आहे. मजहर खान यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. प्रवेशशुल्क वसूल करणाऱ्या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांना गणवेश, आयकार्ड असणे बंधनकारक आहे, मात्र प्रत्यक्षात त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसते.
शहरामध्ये नव्याने येणाऱ्या बहुसंख्य वाहनचालकांना कॅन्टोन्मेंटच्या प्रवेश शुल्काची माहिती नसते, त्यामुळे ते चेकपोस्टवर चुकून पैसे न भरताच पुढे निघून जातात. ठेकेदारांकडील पोरांकडून या वाहनांचा टु-व्हीलरवर भरधाव वेगात पाठलाग केला जातो. संबंधित वाहनचालकाला गाठून त्याच्याकडून दंडासहित रक्कम वसूल केली जाते. अनेकदा तर दंड घेण्यासाठी मुद्दामहून वाहनचालकांना पुढे जाऊ दिले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
ठेकेदाराकडून परवानगी नसलेल्या ठिकाणी प्रवेशशुल्क वसुली केली जात आहे का, याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- डॉ. किरण मंत्री,
उपाध्यक्ष,
पुणे कॅन्टोमेंन्ट बोर्ड