तुळशीबागेतील भीषण आगीत दुकान खाक
By Admin | Updated: February 4, 2015 00:27 IST2015-02-04T00:27:40+5:302015-02-04T00:27:40+5:30
तुळशीबागेतील कपड्यांच्या दुकानाला आग लागून कपडे, लेदर बॅग, चप्पल असा माल बेचिराख झाला. आगीचे स्वरूप भयंकर होते.

तुळशीबागेतील भीषण आगीत दुकान खाक
पुणे : तुळशीबागेतील कपड्यांच्या दुकानाला आग लागून कपडे, लेदर बॅग, चप्पल असा माल बेचिराख झाला. आगीचे स्वरूप भयंकर होते. आज मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे ४ च्या सुमारास शमली. जीवितहानी झाली नाही. सिंंहगड रस्त्यावरील माणिकबागेत दूध डेअरीला पहाटे सव्वादोनच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले.
बुधवार पेठेतील वाकणकर निवास इमारतीत तळमजल्यावर २ हजार चौरस फूट आकाराचे दुकान असून, आतमध्ये ४ ते ५ कप्पे करून दुकाने थाटण्यात आली होती. महाराष्ट्र बँकेच्या मागील परिसरात, रहिवासी भाग असलेल्या ठिकाणी ही आग लागली.
आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाचे ९ बंब व २ टँकर एकापाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनाग्रस्त दुकानाकडे जाण्यासाठी दलाच्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रेलिंंगचा अडथळा आला. तो कापून बंब दुकानाजवळ नेऊन पाण्याचा फवारा मारण्यात आला. शेजारील इमारतीतील रहिवाशांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
या दुकानात पत्र्याची शेड करून ४-५ छोटी दुकाने तयार करण्यात आली होती. या पत्र्यांमुळे आगीपर्यंत पाणी पोचत नव्हते. आगीच्या धगीमुळे पत्रे खाली पडल्याने कपडे, लेदर बॅगा व चप्पल अशा वस्तू बेचिराख झाल्या. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली आणि पहाटे ४ च्या सुमारास पूर्णपणे शमली. दुकानमालक केदार वाकणकर यांना या आगीमुळे मोठा धक्का बसला. आगीत ५ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान झाले असावे, असा अग्निशामक दलाचा अंदाज आहे. आगीचे कारण समजलेले नाही. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, स्थानक अधिकारी प्रकाश गोरे तसेच समीर शेख, राजेश जगताप, संजय रामटेके, गजानन पाथ्रुडकर यांच्यासह ३०-४० कर्मचारी घटनास्थळी उशिरापर्यंत आग शमविण्याचे प्रयत्न करीत होते.
(प्रतिनिधी)
४आगीची दुसरी दुर्घटना सिंंहगड रस्त्यावरील माणिकबागेत झाली. पहाटे सव्वादोनच्या सुमारास आगरवाल डेअरी या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानास आग लागली. नागरिकांनी ही माहिती दलास कळविल्यानंतर अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली गेली. दुकानमालक घटनास्थळी आल्यानंतर दुकानाचे कुलूप उघडून पाण्याचा मारा करण्यात आला. स्वयंपाकाचे दोन सिलिंंडर बाहेर काढण्यात आले. त्यातील एक सिलिंंडर गळका होता. दुकानातील वायरिंग पूर्णपणे जळाले असून आगीचे कारण समजलेले नाही. विद्युत विभागाच्या अहवालानंतर ते समजू शकेल.
४ दुकानात पोटमाळा काढून दुग्धजन्य पदार्थ तेथे ठेवले होते. ते व फर्निचर आगीत जळाले. दुपारी अडीचच्या सुमारास डेअरी बंद करण्यात आली होती. सिंंहगड रस्ता अग्निशामक दलाचे प्रमुख प्रभाकर उमराटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग शमविण्यासाठी प्रयत्न केले.
तुळशीबागेतील अरुंद बोळात लागलेली आग शमविताना अग्निशामक दलास मोठा अडथळा आला. मध्यंतरी सुरक्षिततेच्या कारणास्तव तुळशीबागेत पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त होता. मात्र, आगीसारख्या दुर्घटनांमध्ये तुळशीबाग असुरक्षितच असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले. महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या मागील भागातून तुळशीबागेकडे जाताना सुरूवातीलाच दुर्घटना झाली. या भागात लोखंडी रेलिंंग लावण्यात आले होते. त्यामुळे बंब आतमध्ये जाण्यास अडथळा आला. मात्र, अरूंद बोळ लक्षात घेऊन बाबू गेनू चौकाच्या बाजूनेही बंब आणून पाण्याच्या पाइपलाइन आगीपर्यंत नेत आग शमविण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. महानगरपालिकेनेच गर्दीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ही रेलिंंग लावली होती. त्याला असलेल्या कुलुपाची किल्ली कोणाकडे आहे, हे माहिती नसल्याने पाचच मिनिटांत रेलिंंग तोडण्यात आली. स्थानिक अधिकारी प्रकाश गोरे यांनी या माहितीस दुजोरा दिला.