वारजे भागात बांधकाम ठेकेदारावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST2021-06-06T04:09:24+5:302021-06-06T04:09:24+5:30

पुणे : वारजे भागातील डुक्कर खिंड परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी बांधकाम ठेकेदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. वेळीच ...

Shooting at a construction contractor in Warje area | वारजे भागात बांधकाम ठेकेदारावर गोळीबार

वारजे भागात बांधकाम ठेकेदारावर गोळीबार

पुणे : वारजे भागातील डुक्कर खिंड परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी बांधकाम ठेकेदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. वेळीच सावध होऊन पलायन केल्याने ठेकेदाराचा जीव वाचला. हल्लेखोरांनी सुरुवातीला अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रवींद्र सखाराम तागुंदे (वय ३६, रा. वारजे) असे या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. तागुंदे यांचे वारजे परिसरातील मुंबई -बंगळुरू बाह्यवळण रस्त्यावरील सर्व्हिस रोडला इमारतीत कार्यालय आहे. त्यांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ते कार्यालयासमोर आले. रस्त्याच्या कडेला कारमधील व्यक्तीशी ते बोलत होते. त्याचवेळी पाठीमागून मोटारसायकलवरून दोघे जण आले. रस्त्याकडेला जागा नसतानाही त्यांनी बाजूला मोटारसायकल लावल्याने तागुंदे यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तेव्हा पाठीमागे बसलेल्याच्या हातातील पिस्तूल पाहून ते पटकन खाली वाकले. तेव्हा हल्लेखोरांनी जवळून २ गोळ्या झाडल्या. पण तागुंदे वाकल्यामुळे त्यांचा नेम चुकला. ही संधी साधून तागुंदे मागच्या बाजूला पळाले. त्यानंतरही हल्लेखोराने आणखी दोन गोळ्या झाडल्या. या हल्लेखोरांच्या पाठोपाठ आणखी दोघे जण मोटारसायकलवरून आले. तांगुदे पळाल्याने बचावले. हल्ला वाया गेल्याचे लक्षात आल्यावर हल्लेखोर उलट्या दिशेने पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांची पथके रवाना

तागुंदे यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्र्यात या हल्ल्याची दृश्ये कैद झाली आहेत. मात्र, ती बऱ्याच लांबवरून टिपली गेली आहेत. हल्लेखोरांचा माग करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तागुंदे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वी त्यांची दोन खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. पूर्ववैमनस्य किंवा आर्थिक वादातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Shooting at a construction contractor in Warje area