नाझरे जलाशय होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:23 IST2017-08-11T02:23:39+5:302017-08-11T02:23:39+5:30
येथील नाझरे स्वच्छता मोहिमेला कडेपठार पतसंस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमुळे जलाशय चकाचक होणार आहे. सुमारे दोन ते तीन तासांच्या श्रमदानातून पहिल्याच दिवशी सहा ट्रॉली निर्माल्य, विसर्जित केलेले कपडे तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.

नाझरे जलाशय होणार चकाचक
जेजुरी : येथील नाझरे स्वच्छता मोहिमेला कडेपठार पतसंस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमुळे जलाशय चकाचक होणार आहे. सुमारे दोन ते तीन तासांच्या श्रमदानातून पहिल्याच दिवशी सहा ट्रॉली निर्माल्य, विसर्जित केलेले कपडे तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत कडेपठार पतसंस्थेचे अध्यक्ष माणिकराव झेंडे-पाटील, सचिव अरविंद शेंडकर, संचालक संपत कोळेकर, रोहिदास कुदळे, रामचंद्र माळवदकर, इंदू फार्माचे संचालक तथा जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, जेजुरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन. डी. जगताप, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, लवथळेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश लेंडे, गणेश डोंबे, पाटबंधारे शाखा अभियंता एस. एन. चवलंग, वरिष्ठ लिपिक विश्वास पवार, कडेपठार पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, शहरातील पत्रकार व परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असला, तरी कोरड्या पडलेल्या जलाशयात प्रचंड अस्वच्छता असून त्यांची साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे स्वच्छता मोहिमेला गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही मोहीम पूर्ण जलाशय स्वच्छ होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येईल. शनिवारी (दि. १२) शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय जिजामाता विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कूल, इंदू इंग्लिश स्कूल, दादा जाधवराव विद्यालय आदी विद्यालयांमधील विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, कचरा गोळा होणार आहे. यात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था कडेपठार मेडिकल फाउंडेशन कडेपठार पतसंस्थेकडून करण्यात येईल, अशी माहिती माणिकराव झेंडे-पाटील यांनी दिली.
जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात असणारे व्यावसायिक हटवण्याची येथील शेतकºयांची मागणी असून जलाशयावर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक शेतकºयांनी पाटबंधारे अधिकाºयांना पाणलोट क्षेत्रात धार्मिक विधीची दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांची दुकाने हटवावीत, भाविकांची वाहने धरणात येण्यापासून मज्जाव करावा अशा मागण्या केल्या आहेत.
पाणलोट क्षेत्रात अनेक व्यावसायिक दुकाने थाटतात, भाविकांची वाहने येतात वाहने-कपडे धुणे, स्नानविधीमुळे येथील पाणी दूषित झाले होते. हे पाणी सुमारे ५० गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. त्यामुळे पुढील काळात जलाशय प्रदूषित होणार नाही, याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी उपस्थितांनी अधिकाºयांकडे केली असून त्याबाबत पाटबंधारे विभागाकडून पोलीस ठाण्याला पत्र देण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते.
साठा कमी असतानाही उपसा
नाझरे (मल्हारसागर) जलाशय कोरडा पडलेला आहे. सध्या जलाशयात दुर्गंधी सुटलेला व पिण्यालायक नसलेला गाळमिश्रित पाणीसाठा आहे. असे असतानाही जेजुरी नगरपालिका व इंडियन सीमलेस कंपनी पाणी उचलत असल्याचे निदर्शनाला आले. ही बाब अधिकाºयांच्या निदर्शनाला आणून देताच सीमलेस कंपनीच्या जबाबदार अधिकाºयांना पाणी उचलण्याचे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणी उचलणे बंद करा
प्रभारी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांना अपाय होणारे पाणी उचलणे बंद करावे, असे सांगण्यात आले. नगरपालिका गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक योगेश जगताप यांनी जलाशयावर जाऊन पाहणी केली आणि पाणीउपसा करणाºया वीज मोटारी कामगारांमार्फत बंद केल्या. मोरगाव, नाझरे व इतर गावांच्या पिण्याच्या पाणी योजना १ आॅगस्टपासून बंद करण्यात आल्या आहेत.