शिवसृष्टी की मेट्रो? काय ते ठरवा!
By Admin | Updated: November 3, 2015 03:38 IST2015-11-03T03:38:01+5:302015-11-03T03:38:01+5:30
कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी असे दोन प्रस्ताव पाठवल्यामुळे राज्य सरकारने पालिकेला दोन्हीपैकी नक्की काय करायचे त्याचा निर्णय घेण्याबाबत

शिवसृष्टी की मेट्रो? काय ते ठरवा!
पुणे : कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी असे दोन प्रस्ताव पाठवल्यामुळे राज्य सरकारने पालिकेला दोन्हीपैकी नक्की काय करायचे त्याचा निर्णय घेण्याबाबत पत्र पाठवले आहे. मेट्रोच्या प्रस्तावाबाबत केंद्र व राज्यस्तरावर जोरदार हालचाली सुरू असल्यामुळे पालिकेला लवकरच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.
यासंदर्भात बोलताना महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले, की हे दोन्ही प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचे आहेत व ते दोन्ही व्हावेत अशीच महापालिकेची इच्छा आहे. सन २०१० मध्ये पालिकेने राज्य सरकारला नियोजित शिवसृष्टीचा प्रस्ताव पाठवला होता. कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोचा रिकामा असलेला भूखंड यासाठी निश्चित केला होता. त्यानंतर काही वर्षांनी मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव तयार झाला. त्यात मेट्रो स्टेशनसाठीही हीच जागा निश्चित झाली. त्याचाही प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
उपमहापौर आबा बागुल, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, अशोक हरणावळ, सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक दीपक मानकर, जयश्री मारणे, ओमप्रकाश बकोरिया, शहर अभियंता प्रशांत वाघमारे व अन्य काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
प्रकल्प महत्त्वाचा, पैसे उभे करू
सलग ५ वर्षांचा कालावधी लागणाऱ्या या प्रकल्पासाठी काही कोटी रुपये लागणार आहेत. जकात, एलबीटी बंद यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे प्रशासनाकडून सतत सांगण्यात येते. असे असताना या प्रकल्पासाठी इतका खर्च कसा करणार, असे विचारले असता महापौर धनकवडे यांनी, ही शिवसृष्टी आहे, त्यासाठी कधीही पैसे कमी पडणार नाहीत असे सांगितले. साधारण साडेतीन वर्षांनंतर प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करता येईल, असा देसाई यांचा अंदाज आहे. यातून पुण्याला एक वेगळी ओळख मिळणार आहे. महाराजांचे बालपण पुण्यात गेले, त्यांचे नित्यस्मरण देणारा हा प्रकल्प पुण्यात होणे यात वेगळेच औचित्य आहे, त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी प्रकल्प होईलच, असा निर्धार महापौरांनी व्यक्त केला.