शिवशाही सुसाट, पण निम्मे रस्त्यावर, निम्मे आगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:39+5:302021-09-06T04:15:39+5:30
शिवशाही गाड्यांना प्रवाशांचा वाढत प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळात अनेक गाड्या असल्या तरीही ...

शिवशाही सुसाट, पण निम्मे रस्त्यावर, निम्मे आगारात
शिवशाही गाड्यांना प्रवाशांचा वाढत प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळात अनेक गाड्या असल्या तरीही लालपरीला प्रवाशांचा नेहमीच चांगला प्रतिसाद लाभतो. आता गेल्या काही दिवसांपासून शिवशाहीला देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवशाहीचे भारमान देखील वाढत आहे. पुणे विभागात जवळपास ९० शिवशाही गाड्या असून, त्यापैकी ४५ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. तर उर्वरित गाड्या आगारात उभ्या आहेत.
कोविडनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या ५०० गाड्या विविध आगारात सेवा देत आहेत. पुणे विभागात एकूण १३ आगार असून, पैकी केवळ चारच आगाराकडे शिवशाही बसेस आहे. यात देखील सर्वधिक गाड्या ह्या शिवाजीनगर ४५ (वाकडेवाडी) या आगाराकडे आहेत. तर सर्वात कमी गाड्या ह्या पिपरी चिंचवड (१४ बस) आगाराकडे आहेत. पुणे विभागात धावणाऱ्या शिवशाही गाड्यांना जवळपास ४० ते ४५ टक्के भारमान लाभत आहे.
----------------------------
जिल्ह्यात एकूण आगार :
पुणे विभागात एकूण १३ आगार आहेत. पैकी ४ आगारात शिवशाही बस आहेत. यात शिवाजीनगर (वाकडेवाडी), पिंपरी चिंचवड, बारामती व स्वारगेट या आगाराचा समावेश आहे, असे मिळून ९० शिवशाही गाड्या आहेत. त्यापैकी जवळपास ४५ गाड्या रस्त्यावर धावत आहेत.
--------------------------
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही :
पुणे-औरंगाबाद, पुणे-सोलापर, पुणे-बोरीवली, पुणे-ठाणे, पुणे-पणजी, पुणे-कोल्हापूर, पुणे-रत्नागिरी, पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-सावंतवाडी आदी मार्गावर शिवशाही गाड्या धावत आहे.
---------------------
बसचे दररोज सॅनिटायझेशन :
शिवशाही, लालपरी आदी गाड्या स्वारगेट, सह अन्य महत्त्वाच्या आगारात आल्यानंतर व तसेच त्या गाड्या पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी परत एकदा सॅनिटायझेशन केले जाते. यासाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याच्याकडे केवळ बसेसचे सॅनिटायझेशनएवढी जवाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वारगेट बसस्थानकांवर रोज एक हजारहून अधिक गाड्या स्वारगेट बस स्थानकांवर येतात आणि जातात.
---------------------
स्वारगेट बसस्थानकावरून सुटणाऱ्या शिवशाही गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. भविष्यात आणखी चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा आहे.
- सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट, पुणे एसटी विभाग