शिवसेना विरुद्ध शिवसैनिक!
By Admin | Updated: February 15, 2017 01:52 IST2017-02-15T01:52:19+5:302017-02-15T01:52:19+5:30
मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गण या वेळी सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव झाला आणि या गणात साऱ्याच पक्षाच्या उमेदवारांची

शिवसेना विरुद्ध शिवसैनिक!
पौड : मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गण या वेळी सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव झाला आणि या गणात साऱ्याच पक्षाच्या उमेदवारांची मांदियाळी निर्माण झाली. या गणात अन्य पक्षाच्या तुलनेत शिवसेना पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी कहर केला. सुरुवातीला तब्बल २१ जणांनी आपल्या उमेदवारीची इच्छा प्रगट केली. प्रत्यक्ष अर्ज भरतेवेळी शिवसेनेचे विद्यमान उमेदवार सचिन साठे यांच्यासह अन्य ६ जणांनी अर्ज भरले होते.
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख दत्ता टेमघरे यांनी जुन्या शिवसैनिकांना विचारात न घेता आपल्या मर्जीतील सचिन साठे यांना उमेदवारी दिल्याचे कारण पुढे करत या गणातील प्रमुख शिवसैनिकांनी बंडखोरी करत जिल्हाप्रमुखांच्या विरोधातच दंड थोपटले.
या बंडोबांना थंड करण्यात विनायक राऊत, विजय शिवतारे यांच्यासह प्रत्यक्ष मातोश्रीवरूनही अनेकांना प्रयत्न करावे लागले. या बंडखोर उमेदवारांपैकी प्रत्येकालाच शेवटच्या क्षणी आपल्यालाच उमेदवारी मिळणार ही आशा होती, पण पक्षश्रेष्ठीनी सर्वांनाचं झुलवत ठेऊन साठे यांचे नाव नक्की केल्याचे जाहीर केले.
पक्षाने आपली गेली अनेक वर्षांची निष्ठा व पक्षासाठीचे योगदान लक्षात न घेता पक्षात नव्याने आलेले दत्ता टेमघरे यांनाच महत्त्व देऊन आपल्याला डावलले.
हा रोष मनात धरून नाना शिंदे यांना पुढे करत बंडखोरांनी आपली उमेदवारी माघारी घेत आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या गणात शिवसेनाविरुद्ध अन्य पक्ष याऐवजी शिवसैनिक विरुद्ध शिवसेना अशी निकराची लढाई पाहायला मिळत आहे. (वार्ताहर)