शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द
By Admin | Updated: October 31, 2015 01:24 IST2015-10-31T01:24:31+5:302015-10-31T01:24:31+5:30
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले होते.

शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले होते. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द करून त्या जागी पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे पत्र निवडणूक आयोगास पाठविले आहे. पीएमपी संचालकपदी देशमुख यांची मुख्य सभेने नियुक्ती केली होती. त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने पीएमपी संचालकपद रिक्त झाले आहे.
प्रमोद भानगिरे, भरत चौधरी पाठोपाठ विजय देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ १५ वरून १२ वर घसरले आहे. प्रभाग क्रमांक ४४ ब मधून देशमुख निवडून आले होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय मोरे यांनी लघुवाद न्यायालयामध्ये याप्रकरणी याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायाधीशांनी मोरे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवक पद रद्दचे आदेश काढले. शुक्रवारी पीएमपीची संचालक मंडळाची बैठक होती; मात्र त्यापूर्वी देशमुख यांचे पद रद्द झाल्याने त्यांना बैठकीला उपस्थित राहता आले नाही. विधानसभा निवडणुकीत प्रमोद भानगिरे यांनी सेनेचा राजीनामा दिला. त्यानंतर जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने चौधरी यांचेही पद रद्द झाले.