विद्यानगर प्रभागात शिवसेनेचे पात्रे विजयी
By Admin | Updated: April 19, 2016 00:58 IST2016-04-19T00:58:39+5:302016-04-19T00:58:39+5:30
विद्यानगर, चिंचवड प्रभाग क्रमांक आठच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राम पात्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश भोसले यांचा १३६९ मतांनी पराभव केला.

विद्यानगर प्रभागात शिवसेनेचे पात्रे विजयी
चिंचवड : विद्यानगर, चिंचवड प्रभाग क्रमांक आठच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राम पात्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश भोसले यांचा १३६९ मतांनी पराभव केला. शिवसेनेचा विजय झाला. सत्ताधारी राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. जोर लावूनही भाजपाला यश मिळाले नाही. तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पैशाच्या विरोधात सामान्य कार्यकर्ता जिंकला, अशी प्रतिक्रिया पात्रे यांनी दिली.
विद्यानगर प्रभाग क्रमांक प्रभाग आठचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला होता. त्यानंतर शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. निवडणुकीत एकूण १२पैकी सात जणांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे सतीश भोसले, राष्ट्रवादीचे दत्तात्रय मोरे, भारतीय जनता पक्षाचे भीमा बोबडे, शिवसेनेचे राम पात्रे, भारिपच्या शारदा बनसोडे असे पाच उमेदवार रिंगणात होते. एकूण १० हजार २०८ पैकी ५२०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातून १४१ जणांनी नोटाचा अधिकार बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. (वार्ताहर)