शिवसेना-भाजपाची एकमेकांवर चिखलफेक : अजित पवार
By Admin | Updated: February 17, 2017 05:16 IST2017-02-17T05:16:50+5:302017-02-17T05:16:50+5:30
सत्तेत वाटेकरी असताना आज शिवसेना व भाजप परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, लोकांची मने काय जिंकणार?

शिवसेना-भाजपाची एकमेकांवर चिखलफेक : अजित पवार
पाषाण : सत्तेत वाटेकरी असताना आज शिवसेना व भाजप परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, लोकांची मने काय जिंकणार? खालच्या पातळीवर एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत, हे आपण पाहत आहोत. एक खंडणीखोर म्हणतो तर दुसरा त्याला चोर म्हणतो. यांना सरकार चालवणे जमत नाही. विकासाशी यांना काही घेणे-देणे नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे, प्रमोद निम्हण, विद्या बालवडकर, नीलिमा सुतार यांच्या प्रचारार्थ सोमेश्वरवाडी येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.
पवार म्हणाले, की नोटाबंदीने सगळा देश हैराण झाला, शेतकरी बरबाद झाला, सामान्य माणूस पिचून गेला. मोदी काय बोलले होते आणि काय होत आहे?
नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुषमा निम्हण, रंजना मुरकुटे यांनी सर्व जाती-धर्मांतील आणि तळागाळातील व्यक्ती केंद्रबिंदू मानून विकासकामे केली. नागरिकांचे हित, गरजा ओळखून त्याला प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे जनता त्यांनाच पसंती देईल.
(प्रतिनिधी)