शिर्सुफळला तणाव

By Admin | Updated: February 24, 2015 00:31 IST2015-02-24T00:31:01+5:302015-02-24T00:31:01+5:30

शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला भूसंपादन करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असताना आज मोठ्या

Shiverful tension | शिर्सुफळला तणाव

शिर्सुफळला तणाव

बारामती : शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला भूसंपादन करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असताना आज मोठ्या बंदोबस्तात कामाला सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तंग झाले. पोलिसांच्या दडपशाहीमुळे पोलीस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे वातावरण तंग झाले.
शिर्सुफळ (ता. बारामती) च्या गायरान जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित जागा देखील संपादित केली जाणार आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे.
या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांच्या निवेदनावर अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत, असे असताना आज अचानक कामाला सुरुवात करण्यात आली. त्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध डावलून काम सुरू केल्याने पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. त्यांनंतर ग्रामस्थ व प्रांताधिकारी यांच्या चर्चा झाली. त्यावर तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले.
या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन सौरऊर्जा प्रकल्पात होत असलेल्या गैरप्रकारची माहिती दिली. त्यावर मुंडे यांनी विभागीय आयुक्तांना याबाबत अहवाल सादर करावा. तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे आदेश दिले. त्याची पूर्तता झाली नसताना देखील कामाला सुरूवात करण्यात आली.
आज सकाळी काम सुरु करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद मोरे यांच्यासह बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर येथील पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने गावात दाखल झाले. गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले. यावेळी ग्रामस्थही एकत्र येत आमचा विरोध कायम असल्याचे व याबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले.
ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांचा अहवाल आल्याशिवाय काम सुरू करू नये, असे प्रांताधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश विभागीय आयुक्तांना आहेत. त्यांचा आदेश मला आलेला नाही. त्यामुळे काम थांबवू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे काम सुरू करण्यात आले. ग्रामस्थांनी काही काळ रस्ता रोखून धरला. मात्र पोलीस बळाच्या पुढे काही टिकाव लागला नाही. पोलिसांनी बळाचा वापर करून रास्ता रोको मोडून काढला.
प्रशासनाच्या या बळजबरीमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करण्यात आला. यामुळे आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Web Title: Shiverful tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.