शिवरायांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST2021-02-06T04:17:58+5:302021-02-06T04:17:58+5:30
-शिवरायांची दोन दुर्मीळ पत्रे उजेडात : अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेले पत्र पुणे : छत्रपती शिवाजी महाराज साधू-संतांचा योग्य सन्मान ...

शिवरायांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी जमीन
-शिवरायांची दोन दुर्मीळ पत्रे उजेडात : अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेले पत्र
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज साधू-संतांचा योग्य सन्मान करीत असल्याचा पुरावा समेार आला आहे. शिवरायांनी चिंचवडचे महासाधू श्री मोरया गोसावी यांना बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावात १ चावर जमीन इनाम दिली होती. त्या इनामासंदर्भात माळेगाव बु. (ता. बारामती) येथील मोडी अभ्यासक व इतिहास संशोधक ॲड. ओंकार उदय चावरे यांना पुणे पुराभिलेखागार येथील दफ्तरात मोडी लिपीतील दोन अप्रकाशित व दुर्मीळ पत्रे सापडली. ही दोन्ही पत्रे शिवाजी महाराजांनी लोणी भापकर या गावच्या अधिकाऱ्यांना लिहिली होती.
लोणी भापकर हे गाव इ. स. १६४५-४६ मध्ये शहाजी महाराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वैयक्तिक खर्चासाठी पोटमुकासा मिळाले होते. त्याच काळात शिवाजी महाराजांनी महासाधू मोरया गोसावींना या गावातील १ चावर म्हणजे आजच्या काळातील सुमारे ९२ एकर जमीन इनाम दिली होती. जमिनीची मोजणी होऊन हद्द निश्चित झाल्यानंतर, छत्रपती शिवरायांनी लोणीच्या हुद्देदार व मोकादमांना २० सप्टेंबर १६४६ रोजी हे पहिले पत्र लिहिले असल्याचे ॲड. चावरे यांनी सांगितले.
दुसरे पत्र देखील सन १६४६ सालातले आहे. या लोणी गावातील पिकांवर लावलेल्या करांपैकी काही विशिष्ट भाग हा ‘गला राजहिसा’म्हणजे धान्य स्वरूपातील राजाचा हिस्सा म्हणून कर रूपाने वसूल होत असे. मात्र, मोरया गोसावींच्या इनाम जमिनीवरील तो कर देखील शिवाजी महाराजांनी माफ करून तसे लोणी भापकर गावच्या हुद्देदार व मोकादमांना हे पत्र लिहिले होते. साधू संतांना, सत्पुरुषांना आपल्या घासातला घास देण्याचा शिवरायांचा हा पैलू या पत्रातून नव्याने समेार येतो. तसेच, या पत्रात महाराज तेथील अधिकाऱ्यांना आज्ञा देतात की, यापुढे ‘एक जरायासी तसवीस न देणे’म्हणजे यापुढे मोरया गोसावींना कणभरही त्रास होऊ देऊ नका, अशी आपल्या अधिकाऱ्यांना ताकीद देतात, अशी माहिती चावरे यांनी दिली.
---------------------------
पत्रातील वैशिष्ट्य :
* शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी दिले होते पत्र.
* पत्राचा मायना ‘अजरख्तखाने’ या फारसी स्वरूपाचा.
* इनामापैकी एक चतुर्थांश भाग ‘खासा मिरासीपैकी’म्हणजे खुद्द महाराजांच्या वैयक्तिक बाबीतून दिला होता.
* राजाच्या खासगी उत्पन्नात जमा होणारा धान्य स्वरूपाचा करही महाराजांनी मोरया गोसावींना माफ केला हाेता.