गड ताब्यात ठेवणे शिवसेनेपुढे आव्हान?
By Admin | Updated: January 25, 2017 01:37 IST2017-01-25T01:37:31+5:302017-01-25T01:37:31+5:30
पूर्व हवेलीतील महत्त्वाचा व सध्या शिवसेनेकडे असलेला उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गट ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादी

गड ताब्यात ठेवणे शिवसेनेपुढे आव्हान?
उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील महत्त्वाचा व सध्या शिवसेनेकडे असलेला उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गट ताब्यात
घेण्याचे राष्ट्रवादी पक्षापुढे मोठे आवाहन आहे तसेच तो आपल्याकडे राखण्याचे शिवसेनेलाही जड जाणार आहे. कारण भाजपाची या भागात वाढलेली ताकद ही राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी होऊ पाहत आहे.
त्यातच शिवसेना- भाजपा युती अजून तरी तळ्यात-मळ्यात अशा खडतर वाटेवर आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी हे पण काही गोडीगुलाबीने नांदताना दिसत नाहीत. तसेच या गटातील उरुळी कांचन व सोरतापवाडी या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत.
यामुळे राष्ट्रवादीने मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या गटातील गमावलेली सत्ता पुन्हा मिळवणार का? हा एक प्रश्न आहे तर शिवसेना आपला गड राखण्यात यशस्वी होणार का? हा दुसरा प्रश्न या भागातील जनतेला खऱ्या अर्थाने पडला आहे! त्यासाठी दोन्ही पक्षांमधील कसरत पाहण्यासारखी असणार यात शंकाच नाही.
जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून संचिता संतोष कांचन, हेमलता बाळासाहेब बडेकर, लीलावती बापूसाहेब बोधे इच्छुक आहेत. तर माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या सूनबाई ऋतुजा अजिंक्य कांचन, कुणबी व उरुळी कांचनचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमित कांचन यांच्या पत्नी कीर्ती अमित कांचन या भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत.
उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गट व उरुळी कांचन पंचायत समिती गण हा इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. तसेच सोरतापवाडी पंचायत समिती गणाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
यामुळे उरुळी कांचन व परिसरातील इतर मागास प्रवर्गातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या प्रवर्गाचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १८) येथील राममंदिर येथे झालेल्या सभेत घेतला आहे, पण तो वास्तवात येईल का नाही याबाबत शंका घेतली जात आहे.(वार्ताहर)