शिवकुमार शर्मा यांची ‘अनंत गाथा’
By Admin | Updated: June 24, 2016 01:48 IST2016-06-24T01:48:22+5:302016-06-24T01:48:22+5:30
जादुई सुरांची स्वर्गीय अनुभूती म्हणजे पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन. गोड पदार्थात केशर मिसळावे, त्याप्रमाणे सुरांची एकरुपता त्यांच्या संतुरवादनातून अनुभवायला मिळते.

शिवकुमार शर्मा यांची ‘अनंत गाथा’
पुणे : जादुई सुरांची स्वर्गीय अनुभूती म्हणजे पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन. गोड पदार्थात केशर मिसळावे, त्याप्रमाणे सुरांची एकरुपता त्यांच्या संतुरवादनातून अनुभवायला मिळते. पुणेकर रसिकांना त्यांच्या सुरेल वादनाचा श्रवणानंद अनुभवण्याची पर्वणी उपलब्ध झाली आहे. बनियन ट्रीतर्फे आयोजित आणि ‘लोकमत’च्या सहयोगाने ‘अनंत गाथा’ या सुरेल महोत्सवामध्ये पं. शिवकुमार शर्मा यांचे
संतूरवादन ऐकण्याची संधी मिळणार आहे.
हृदयाला भिडणारे, भावनांशी एकरुप होणारे संगीत प्रत्येकाला भावते आणि काळजाचा ठाव घेते. शास्त्रीय संगीतामध्ये वादन हा गायनाचा आत्मा असतो. त्यादृष्टीने, संतूरवादन हे रसिकांना श्राव्यानुभूती ठरते. ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांची संतूरवरुन फिरणारी हळूवार बोटे आणि त्यातून निर्माण होणारे अवलिया सूर रसिकांसाठी दुग्धशर्करा योगच. दि. २४ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संतूरवादनाची ही मैैफल रंगणार आहे.
‘अनंत गाथा’ या महोत्सवावर मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू येथील रसिकांनी भरभरुन प्रेम केले आहे. पुण्यात हा महोत्सव पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून संगीतप्रेमींसाठी ही मेजवानी ठरणार आहे.
पदमविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाला पं. भवानी शंकर यांची पखवाज आणि रामकुमार मिश्रा यांची सुरेल साथसंगत लाभणार आहे. (प्रतिनिधी)