पिंपरी : राज्यभरातील शिवभोजन केंद्रांना एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सुरू असलेल्या ४० केंद्रांचे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. त्यामुळे केंद्रचालक आर्थिक अडचणीत सापडले असून काही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
शिवभोजन योजना गरीब, श्रमिक, कामगार, विद्यार्थी आणि वृद्धांसाठी उपयोगी ठरली आहे. केवळ १० रुपयांत दोन पोळ्या, भाजी, भात आणि आमटी मिळणारी शिवभोजन थाळी सध्या गरजूंसाठी एकमेव आधार आहे. मात्र, सरकारकडून वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक १५ दिवसांत अनुदान वाटप होणे अपेक्षित असूनही, पाच महिन्यांनंतरही निधी मिळालेला नाही.
अनुदान रखडल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी :
- किराणा दुकानदारांची बिले आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकले.
- योजना चालवणे केंद्र चालकांसाठी जवळपास अशक्य.
- पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वी २० ते २५ केंद्रे कार्यरत होती. मात्र, सध्या फक्त पाच केंद्रेच सुरू
शहरी आणि ग्रामीण अनुदानाचे स्वरूप :
- शहरी भागातील केंद्रांना थाळीस ४० रुपये अनुदान
- ग्रामीण भागातील केंद्रांना थाळीस २५ रुपये अनुदान
- फक्त १० रुपयांमध्ये थाळी उपलब्ध.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण ४० शिवभोजन केंद्रांची १५ एप्रिलपर्यंतची बिले दिली आहेत. १५ दिवसांसाठी मिळून या ४० केंद्रांना सरासरी १९ ते २० लाख रुपये अनुदान वाटप होते. मात्र, १५ एप्रिलनंतरचा निधी अद्याप आलेला नाही, त्यामुळे अनुदान रखडले आहे. - प्रशांत खताळ, अन्न पुरवठा अधिकारी, पुणे विभाग
गरजूंना जेवण मिळावे यासाठी केंद्र सुरू ठेवले होते. मागील पाच महिन्यांचे अनुदान मिळाले नाही. मात्र सातत्याने अनुदान रखडल्यास पुढे केंद्र चालवणे शक्य नाही. शिवभोजन केंद्र चालकांचे थकलेले अनुदान तातडीने द्यावे. - विपुल मित्तल, केंद्र चालक, संभाजीनगर, चिंचवड