‘राष्ट्रवादी’च्या खेळीनेच शितोळे बिनविरोध
By Admin | Updated: March 9, 2015 00:50 IST2015-03-09T00:50:22+5:302015-03-09T00:50:22+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप

‘राष्ट्रवादी’च्या खेळीनेच शितोळे बिनविरोध
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचा महापालिका राजकारणावरील प्रभाव अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आजही त्यांच्या मर्जीनुसारच काम करतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे बहुमत असूनही आमदार जगताप गटाच्या प्रभावामुळे स्थायी समितीची निवडणूक अवघड जाऊ शकते, हे लक्षात घेऊन ज्याच्या नावाला आमदार जगताप गटाकडून विरोध होणार नाही, असा चेहरा म्हणून शितोळेनगर सांगवी प्रभागाचे नगरसेवक अतुल शितोळे यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादीने खेळलेल्या या खेळीमुळेच पहिली टर्म असूनही शितोळे यांना स्थायी सामती सभापतिपदी बिनविरोध निवडून येणे शक्य झाले.
महापालिकेच्या राजकारणात पक्षीय राजकारणाबरोबर, पदाधिकाऱ्यांच्या गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आले आले आहे. कधी चिंचवडचे, पिंपरीचे, तर कधी भोसरीचे आमदार यांच्या गटातटाभोवती हे राजकारण फिरलेले दिसून आले आहे. आपापल्या निकटवर्तीयांना महत्त्वाची पदे मिळावीत, यासाठी प्रत्येक वेळी आमदारांनी ताकद लावली आहे. ‘रोटेशन’ पद्धती अवलंबल्याप्रमाणे महत्त्वाच्या पदांच्या निवड केल्या आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जगदीश शेट्टी यांना स्थायी समिती सभापतिपदी संधी मिळाली. त्यानंतर चिंचवड मतदारसंघातील नवनाथ जगताप यांना आणि पाठोपाठ भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे यांना संधी मिळाली. त्यांच्या रोटेशन पद्धतीनुसार या वेळी पिंपरी मतदारसंघातील कोणाला तरी संधी मिळणे अपेक्षित होते. माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांचे नाव चर्चेत होते. परंतु, विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या राजकारणाला मिळालेल्या कलाटणीमुळे रोटेशन पद्धतीही कोलमडली असून, नवी समीकरणे जुळवली गेली आहेत.
आमदार जगताप यांना सुरुवातीच्या काळात राजकारणात सक्रिय होण्यास मदत करणारे ज्येष्ठ नेते नाना शितोळे हे अतुल शितोळे यांचे पिता. त्यांच्या निधनानंतर अतुल शितोळे यांचे छत्र हरपले. कोणी पाठीराखा नाही, या सहानुभूतीतून आमदार जगताप गटाकडून शितोळे यांच्या नावाला विरोध झाला नाही.स्थायी समिती सभापतिपदासाठी अतुल शितोळे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आमदार जगताप गटात नाराजी निर्माण झाली. जगतापविरोधी गटाने उघडपणे शितोळे यांना पाठिंबा दिला. आमदार जगताप यांचे कट्टर विरोधक नाना काटे, आझम पानसरे, प्रशांत शितोळे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे यांनी स्थायी समिती सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सदिच्छा देण्यासाठी अतुल शितोळे यांची भेट घेतली.(प्रतिनिधी)