शिरूरमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर

By Admin | Updated: February 18, 2017 02:37 IST2017-02-18T02:37:49+5:302017-02-18T02:37:49+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत

In Shirur, only 15 candidates are graduates | शिरूरमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर

शिरूरमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर

शिरूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत. २० उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे, तर दोन उमेदवारांनी शाळाच पाहिली नाही.
यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती शिक्षणापेक्षा निवडून येण्याची क्षमता, घराणे व आर्थिक क्षमता या निकषांवर जास्तीतजास्त उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
लोकशाहीने निवडणूक लढवताना शिक्षणाची अट टाकली नाही. अट असती तर सर्वच पक्षांना पदवीधर, उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घ्यावा लागला असता. जि.प., पं. स. च्या तालुक्यातील अनुक्रमे ७ व १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी बऱ्याच कसरतीने उमेदवार निश्चित केले. किमान १५ ते २५ हजार मतदारांनी निवडून दिलेल्या सदस्याने या गटाचे, गणाचे प्रश्न नीटनेटकेपणे जिल्हा परिषद, पंचायत समितीत मांडून गट व गणाचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र सुशिक्षित सदस्य (किमान पदवीधर) असतील तर कारभार चालवताना निश्चितच सोपे जाईल, अशी सर्वसाधारण मतदारांची अपेक्षा असते. नाही तरी एकदा निवडून आल्यावर सदस्याचे पाच वर्षांत क्वचितच दर्शन होत असल्याने तो सुशिक्षित असला काय आणि नसला काय मतदारांना याचे काही घेणे देणे नसावे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असे प्रत्येकी एक उमेदवार हा ग्रॅज्युएट आहे. नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या उमेदवारांमध्ये चार भाजपा, तीन अपक्ष, तर एक काँग्रेसच्या उमेदवाराचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी १३ उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. यात पाच राष्ट्रवादी, दोन भाजपा, तीन शिवसेना, दोन काँग्रेस तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. पं.स.साठी सर्वाधिक पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. यात दहापैकी सहा पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. भाजपाचे तीन तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा यात समावेश आहे. जि. प. च्या राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार या पोस्ट पदवीधर आहेत. पं. स. ला राष्ट्रवादीचे दोन तर भाजपाचा एक उमेदवार पोस्ट पदवीधर आहे.
शाळेची पायरीच न चढलेल्या उमेदवारांत एक उमेदवार भाजपाचा तर एक उमेदवार शिवसेनेचा आहे. उमेदवारांच्या शिक्षणाबाबतच्या या वास्तवामुळे आश्चर्याचे कारण नाही. कारण ग्रामीण भागातील या निवडणुकांत शिक्षण हा फारसा महत्त्वाचा मुद्दा नसतो. निवडून येण्याची क्षमता, त्या उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती आणि  पक्षाची ताकद याला जास्त  महत्त्व असते. (वार्ताहर)

Web Title: In Shirur, only 15 candidates are graduates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.