शिनोलीत धान्यसाठा पकडला
By Admin | Updated: October 30, 2015 00:09 IST2015-10-30T00:09:18+5:302015-10-30T00:09:18+5:30
रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना तहसीलदार बी. जे. गोरे यांनी रात्री दोनच्या सुमारास १ लाख ५४ हजार रुपयांचे ५२ पोती धान्य पकडले.

शिनोलीत धान्यसाठा पकडला
घोडेगाव : रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना तहसीलदार बी. जे. गोरे यांनी रात्री दोनच्या सुमारास १ लाख ५४ हजार रुपयांचे ५२ पोती धान्य पकडले. शिनोली (ता. आंबेगाव) येथे ही कारवाई करण्यात आली असून, घोडेगाव पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर-भीमाशंकर रस्त्यावर शिनोली गावाजवळ सुरू असलेल्या नवीन इमारतीसमोर रेशनच्या धान्याने भरलेला टेम्पो (एमएच १४/एफ ८५८०) उभा असल्याची माहिती तहसीलदारांना गुप्त माहीतगाराकडून मिळाली. यानंतर त्यांनी समक्ष जाऊन खात्री केली असता, त्यामध्ये गव्हाचे ५० किलोंचे ३५ कट्टे, तांदळाचे ५० किलोंचे १५ कट्टे असा १ लाख ५४ हजार रुपयांचा माल असल्याचे आढळून आले. टेम्पोचालक लहू बोऱ्हाडे यांना विचारले असता त्यांनी हा माल आपला असल्याचे सांगितले.
यावरून हे धान्य अनधिकृतरीत्या स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करण्याच्या उद्देशाने काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याप्रकरणी भारतीय जीवनावश्यक कायद्यानुसार लहू बोऱ्हाडे व अजून एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तहसीलदार बी. जे. गोरे यांनी स्वत: फिर्याद दिली. माल पंचनामा करून घोडेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. पुढील
तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. गिजरे करत आहेत. (वार्ताहर)