शिधापत्रिकाधारकांची शिजेना डाळ, दिवाळीपासून वितरण विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:19 AM2019-03-20T02:19:46+5:302019-03-20T02:20:02+5:30
गेल्या दोन ते पाच महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानातून तूर, उडीद आणि हरभरा डाळ उपलब्ध होत नाही. झाली तर ती केवळ आवश्यकतेच्या ४0 टक्केच उपलब्ध होत आहेत.
पुणे - गेल्या दोन ते पाच महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानातून तूर, उडीद आणि हरभरा डाळ उपलब्ध होत नाही. झाली तर ती केवळ आवश्यकतेच्या ४0 टक्केच उपलब्ध होत आहेत. गेल्या दोन महिन्यांत तर डाळ उपलब्ध करून दिली नसल्याची माहिती हाती आली आहे. याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी
(एफडीओ) कोणतेही उत्तर न देणेच पसंत केले.
फेब्रुवारीअखेरीस शहरात २ लाख ६० हजार ३८३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यावर ११ लाख ८ हजार ६६४ सदस्यांची नोंद आहे.
राज्य सरकारने शिधापत्रिकेमागे प्रत्येकी एक किलो तूर, हरभरा आणि उडीदडाळ देण्याची घोषणा केली होती.
मात्र, डाळींच्या वितरणामध्ये दिवाळीपासून अनियमितता असल्याचे रास्त धान्य दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले.
झोनमधील एक शिधापत्रिका दुकानदार म्हणाला, उडीद, तूर आणि चणा डाळ देण्याची घोषणा केली आहे. मात्र, कार्डसंख्येनुसार धान्य मिळत नाही. माझ्या दुकानात सहाशे कार्ड असतील, तर प्रत्येकी सहाशे किलो डाळ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, ती आवश्यकतेच्या चाळीस टक्केच मिळते. त्यामुळे कोणाला तूर, कोणाला उडीदडाळ द्यावी लागते. आता तर दोन महिन्यांपासून पैसे भरूनही डाळ उपलब्ध झालेली नाही.
झोनमधील रास्त धान्य दुकानदार म्हणाले, की गेले दोन महिने डाळ मिळालेली नाही. तूरडाळ अगदी दिवाळीपासूनच मिळालेली नाही. अनेकदा डाळींचा दर्जादेखील चांगला नसतो. केवळ बाजारभावापेक्षा किंमत कमी असल्याने अनेक नागरिक डाळींची विचारणा करतात. मात्र, डाळ पाहून ती विकत घेत नाहीत.
उत्तर मिळेना...
याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी स्मिता मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. एसएमएसद्वारे त्यांना विचारणा केली असता, त्यावर उत्तर मिळाले नाही.